

ठाणे : महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केल्याने ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल २ लाख ८४ हजार वाहनधारकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट नसल्यास कारवाई
बनावट वाहन क्रमांक प्लेटमुळे वाढणारे गुन्हे, चोरीची वाहने ओळखण्यात येणारी अडचण, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांची अचूक ओळख पटण्यात येणारी अडथळे हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन शासनाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी अनिवार्य केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरित ऑनलाइन अर्ज करून अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"२,८४,००० अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असून २,७५,००० वाहनांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे तसेच २,०६,००० वाहनांवर HSRP बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. HSRP बसवण्याची जबाबदारी परिवहन विभागाने नेमलेल्या तीन अधिकृत कंपन्यांकडे देण्यात आली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्याकडून या प्लेट बसवू नयेत, कारण असे नंबर केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंदवले जात नाहीत व त्याला कायदेशीर मान्यता नसते." - रोहित काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
HSRP साठी अर्ज कसा करावा?
- www. transport. maharashtra.gov.in वर लॉगइन करावे
- वाहनाची माहिती भरावी
- सेवा केंद्र व वेळ निवडून अपॉइंटमेंट घ्यावी
- दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी
मीरा-भाईंदरमध्ये मोठा प्रतिसाद
वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे आता अत्यावश्यक आहे. ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर शहरातही HSRP मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३७,००० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून ३६,००० वाहनांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. २७,१५६ वाहनांवर HSRP बसवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.