
अतुल जाधव/ठाणे
गेट वे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३५ तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबेघोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे ३५ पॅडल बोट व २ मशीन बोट, उपवन तलाव येथे १६ पॅडल बोट व १ मशीन बोट, तर आंबेघोसाळे तलाव येथे ४ पॅडल बोट व १ मशीन बोट उपलब्ध आहे. सदरकामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाण्यात तलावांची संख्या अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी बोटिंगची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.
बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांस सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी, जे नागरिक याला विरोध करतील, त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये, असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
बोटिंगसंदर्भात हलगर्जीपणा करू नये
बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉ. पद्मश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला व बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे, असेही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.