

ठाणे : विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोच्च या तत्त्वावर ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. पालिका क्षेत्रातील सर्व खासगी शाळांच्या इमारतींची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) आता भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था (VJTI) या नामांकित तांत्रिक संस्थांकडून केली जाणार आहे.
शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृत पत्र पाठवून त्यांच्या शाळेच्या इमारतींविषयी आवश्यक तपशील आणि सुरक्षिततेसंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७६९ खासगी शाळा आहेत, त्यापैकी २०९ अनुदानित, ५६० विनाअनुदानित, तसेच १०२ महापालिका शाळा (९५ प्राथमिक व ७ माध्यमिक) कार्यरत आहेत. काही शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडेच ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अनेक शाळांमधील अपुऱ्या सोयीसुविधा आणि असुरक्षित इमारतींचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने हालचाल करत ही तपासणी सुरू केली आहे.
ठाणे महापालिकेच्या या निर्णयामुळे शाळा इमारतींची सुरक्षितता सुनिश्चित होऊन विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेला नवी मजबुती मिळेल, तसेच ठाण्यातील शैक्षणिक वातावरण अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार होईल, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
शाळांना उपायुक्तांचे पत्र
शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांच्या पत्रानुसार,सर्व शाळांनी इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रयोगशाळा, शौचालये, विश्रांतीगृहे, कॅन्टीन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.