

ठाणे : उशिराने सुरू झालेल्या पावसाने आता ठाण्यात चांगलाच जोर धरला असून शहरासह धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे.
गुरुवारी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या अवघ्या पाच तासांत ठाणे शहरात ३२.०१ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ६०१.२८ मिमीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८६५.१५ मिमी पाऊस झाला होता.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही पूर्व-प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यापूर्वीच्या २४ तासांत (१ जुलै सकाळी ८.३० ते २ जुलै सकाळी ८.३०) शहरात तब्बल १५७.९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.
या मुसळधार पावसामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण ७४ तक्रारी प्राप्त झाल्या.
त्यामध्ये २० ठिकाणी झाडे पडणे, १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडणे, १३ धोकादायक झाडांबाबत तक्रारी, २० ठिकाणी पाणी साचणे, एका ठिकाणी आग लागणे, एका इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना, पाणीवाहिनी गळतीची एक तक्रार तसेच इतर तीन तक्रारींचा समावेश होता.
दरम्यान, गुरुवारी दुपारनंतरही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू असल्याने प्रशासनाकडून शहरातील विविध भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महापालिकेची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोरबे धरणात २६.९० टक्के
२ जुलै रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार मोरबे धरणात २६.९० टक्के, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर (एमसीएम) असून, सध्या धरणात ५१.३५४ एमसीएम (२६.९० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी ६९.६७ मीटर इतकी असून, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १५४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान ४२५.२० मिमी इतके झाले असून धरणाचे दोन्ही रेडियल दरवाजे सध्या बंद आहेत.
भातसा धरणात २८.२३ टक्के जलसाठा
भातसा धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ३००.०४५ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी २६६.०४५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी १०८.१० मीटर इतकी आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ५२ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान २६८ मिमीवर पोहोचले आहे. भातसा धरणातूनही सध्या कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.