ठाणे : ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या आधीच आयाराम गयाराम राजकारणाला ऊत आला आहे. एकनाथ शिंदे गटाने शरद पवार गटाला कळव्यात मोठा हादरा दिला असून गुरुवारी कळव्यातील शरद पवार गटातील सात माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. कळवा-मुंब्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गड समजल्या जाणाऱ्या कळव्यात पुढील काळात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
पुढील चार महिन्यात महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ठाण्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता शरद पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, महेश साळवी, मनिषा साळवी, शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेतला. त्यानंतर अवघ्या चार तासातच आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि त्यांचे सुपुत्र तथा युवा नेते मंदार केणी यांनी देखील दुपारी दोनच्या सुमारास शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नवीन विकास आराखड्यामुळे पुनर्विकास अशक्य होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ४० वर्षे जुन्या इमारती आहेत. पाच वर्षात नागरिकांना इमारती रिकाम्या कराव्या लागतील. काही लोक इमारतीची दुरुस्ती करत आहे. परंतु बांधकाम स्थिरता प्रमाणपत्र तीन वषार्पेक्षा जास्त मिळत नाही.
त्यामुळे येणाऱ्या भविष्याचा आता विचार करणे गरजेचे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला या सर्वांवर आश्वासन दिले, असेही पाटील म्हणाले.
धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस समाजकारणात किंवा राजकारणात येतो, त्यावेळी त्याची अपेक्षा असते की, आपल्या प्रभागाचा विकास व्हावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासाबद्दल आम्ही काय बोलणार, त्यांनी केलेला विकास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. तो आम्हाला सांगायची गरज नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम केलेली आम्ही माणसे आहोत, त्यामुळे आम्हाला विकासाची सवय आहे. परंतु मधल्या काळात सत्ता नसल्यामुळे कळव्याचा विकास रखडला होता. सत्ता येणारच नाही, असे आमचे म्हणणेच नाही. पण कळव्यापुढे आता वेळ नाही. - मिलींद पाटील