अतुल जाधव/ठाणे
मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेतही महापौरपदाबाबत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेतून महापौर कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संभाव्य आरक्षणानुसार विविध नावांवर जोरदार चर्चा सुरू असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
महापौरपदासाठी खुले आरक्षण पडल्यास शिंदेसेनेतील चार ज्येष्ठ व प्रभावी नेत्यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत. त्यामध्ये राजेश मोरे, रमाकांत मढवी, राम रेपाळे आणि हनमंत जगदाळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आलेले राजेश मोरे हे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. २०२२ मधील शिंदे गटाच्या बंडाच्या काळात आमदार व नेत्यांची जबाबदारी सांभाळण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी गुवाहाटी येथे यशस्वीरीत्या पार पाडले होते. माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरात राजकीय चमत्कार घडवत महायुतीचे ११ पैकी ११ नगरसेवक निवडून आणले.
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या मढवींनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिव्यातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. या दमदार कामगिरीमुळे त्यांचे नाव महापौर पदासाठी पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालपणीचे मित्र आणि शेजारी राहणारे राम रेपाळे हे शिंदे सेनेतील ‘ऑपरेशन टायगर’चे महत्त्वाचे सूत्रधार मानले जातात. कर्करोगावर मात करून पुन्हा सक्रिय राजकारणात उतरलेले रेपाळे यांना ‘शिंदेसेनेतील शरद पवार’ अशीही ओळख आहे. शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय व रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांचे नावही महापौर रेसमध्ये आघाडीवर आहे. एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधी गटात असले तरी वैयक्तिक व राजकीय संबंध अत्यंत जवळचे असलेले हनमंत जगदाळे हे अनुभवी नेतृत्व मानले जातात. प्रशासनावर मजबूत पकड, वादविवादांपासून दूर राहणारी प्रतिमा आणि प्रभाग क्रमांक ६ एकहाती जिंकण्याची कामगिरी यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.
महिलांमध्ये ‘नातेवाईक फॉर्म्युला’ चर्चेत
महापौरपद महिला आरक्षित झाल्यास शिंदेसेनेतील आमदार, मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीषा सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक, पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. महापौरपद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाल्यास दर्शना जानकर, विमल भोईर आणि पद्मा भगत यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी ठाणे महापालिकेतील सत्तासंघर्ष, अंतर्गत राजकीय गणिते आणि इच्छुकांची संख्या पाहता शिंदे सेनेत जोरदार हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट चित्र आहे.