

विशाल ब्राम्हणे / ठाणे :
वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ (ड) मधील शिवाई नगर, गणेश नगर, निसाळवाडी, गजानन महाराज मठ तसेच कोकणी पाडा परिसरात दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या भागातील सुमारे ३० वर्षे जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन पाईपलाइन टाकण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडे देण्यात आला असून त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी दिली आहे.
या भागातील जुन्या व जीर्ण झालेल्या पाईपलाइन्समुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, वारंवार खंड पडणे तसेच पावसाळ्यात दूषित पाण्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राणे यांनी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे लेखी निवेदन देत जुन्या जलवाहिन्या तातडीने बदलून नवीन वितरण लाइन टाकण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या नव्या आराखड्यानुसार परिसरातील घरांना 'उन्नती' जलकुंभातून थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १०० ते १५० मि.मी. व्यासाच्या नवीन वितरण जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे पाण्याचा दाब आणि उपलब्धता दोन्ही वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे शिवाई नगर, गणेश नगर, म्हाडा वसाहत, कोकणी पाडा तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आम्ही गांभीर्यान घेतला आहे. याशिवाय येऊर परिसरातील आदिवासी वस्तीतील पाणी धनदांडग्यांनी पळविल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्यांच्या समस्या सोडवण्यालाही प्राधान्य देत त्या भागातील नागरिकांनाही सुधारित पाणीपुरवठा मिळावा, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यादृष्टीने पाऊले टाकलेली आहेत. त्यामुळे शिवाई नगर, कोकणी पाडा आणि येऊर व परिसरातील नागरिकांना भविष्यात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
सीताराम राणे, नगरसेवक प्रभाग क्र. ५