

फरियाल सय्यद/ठाणे
ठाणे जिल्ह्यात अचूक आणि पारदर्शक मतदार यादी सुनिश्चित करण्यासाठी ‘विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरोघरी जाणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहकार्य करावे, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधील ६,८९४ मतदान केंद्रांवर एकूण ७४,५०,५१५ मतदारांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ऑनलाइन ‘एसआयआर मॅपिंग’च्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर क्षेत्रनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे
३० जून-२९ जुलै : बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचे नाव, वय आणि लिंग आदींची पडताळणी करतील. तसेच मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे शोधून काढतील.
५ ऑगस्ट : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर त्रुटी असलेल्या नोंदींवर सुनावणी घेतली जाईल.
५ ऑगस्ट-४ सप्टेंबर : या कालावधीत नागरिक नमुना अर्ज ६ (नवीन नोंदणी), नमुना अर्ज ७ (नाव वगळणे) किंवा नमुना अर्ज ८ (दुरुस्ती) चा वापर करून अधिकृत दावे आणि हरकती दाखल करू शकतात. डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले की, २०२६ च्या छापील मतदार तपशिलांची पडताळणी, प्रगणक फॉर्म आणि अधिकृत घोषणापत्रांशिवाय कोणतीही नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही. याशिवाय, ज्या भागांत ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदार नोंदणी झाली आहे, अशा भागांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहनही राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.