प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

Thane : पालिका हद्दीतील तलावांना मिळणार गतवैभव; केंद्राच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत ८ पैकी ६ तलावांचे प्रस्ताव मंजूर

आठ तलावांचा कायापालट केंद्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेंतर्गत करण्यात येणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव पालिकेच्या प्रदूषण विभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी सहा तलावांच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असून उर्वरित दोन...
Published on

ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांना गतवैभव प्राप्त होणार आहे. सध्या ठाण्यातील तलावांना अवकळा प्राप्त झाली आहे.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होऊन माशांच्या मृत्यू पडण्याच्या घटना नुकतीच घडली आहे. भविष्यात घटना घडू नये, तलाव प्रदूषणमुक्त असावे, यासाठी आता ठाणे पालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरातील आठ तलावांचा कायापालट केंद्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेंतर्गत करण्यात येणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा तलावाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती प्रदूषण विभागाने दिली.

ठाणे महापालिका हद्दीत ३७ तलावे असून त्यापैकी ३ तलावांचे संवर्धनासह जतन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेले मासुंदा तलाव, वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव आणि उपवन येथील तलावांचा समावेश आहे. अशातच मागील काही दिवसांपासून पालिका मुख्यालयासमोर असलेल्या सिद्धेश्वर तलावात वाढलेल्या प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यू होण्याच्या तीन घटना काही दिवसांच्या अंतराने घडल्या आहेत.

या तलावात मृत्यू पडलेल्या माशांमुळे आजूबाजूच्या परिसरात त्याची दुर्गंधी देखील पसरू लागली आहे. यावर उपाययोजना करण्यास पालिकेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. असे असले तरी, भविष्यात पालिका हद्दीतील तलावांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

पालिका हद्दीतील ठाणे, कळवा, दिवा आणि मुंब्रा शहरतील विविध आठ तलावांचा कायापालट केंद्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेंतर्गत करण्यात येणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव पालिकेच्या प्रदूषण विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यापैकी सहा तलावांच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून उर्वरित दोन तलाव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्रदूषण विभागाने दिली. पालिकेने उचललेले पाऊल कितपत कायम राहणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.

कोणती कामे होणार?

राज्य सरोवर संवर्धन या योजनेंतर्गत तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलावातील गाळ काढणे, तलावांचे पुनरुज्जीवन, बायोरेमेडिएशन करणे, सभोवताचे सांडपाणी तलावात येऊ नये, यासाठी गटर बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी एसटीपी उभारणे, चेनलिंक फेन्सिंग उभारणे, गॅबियन वॉल उभारणे, लँडस्केप व विद्युत व्यवस्था उभारणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

८ पैकी ६ तलाव मंजूर

ठाणे पालिका हद्दीतील तलावांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात पालिका हद्दीतील दिवा, सिद्धेश्वर, गोकुळ नगर, खर्डी, शिळ, तुर्फे पाडा या तलावांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मखमली, हरयाली या तलावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

ठाणे पालिका हद्दीतील तलावात होणारे प्रदूषण रोखण्याबरोबरच तलावांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेंतर्ग आठ तलावांचे प्रास्तव तयार करण्यात आले आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यापैकी सहा तलावांचे प्रास्तव जानेवारी २०२५ मध्ये मंजूर झाले असून उर्वरित दोन तालानाचे प्रास्तव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्यांना हि लवकरच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. - मनीषा प्रधान, प्रदूषण अधिकारी, ठामपा.

logo
marathi.freepressjournal.in