ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; ५४ योजनांमध्ये झोपडीधारकांना सदनिकांचा ताबा; २६ योजनांचे बांधकाम सुरू

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यात येत आहे.
ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; ५४ योजनांमध्ये झोपडीधारकांना सदनिकांचा ताबा; २६ योजनांचे बांधकाम सुरू
ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; ५४ योजनांमध्ये झोपडीधारकांना सदनिकांचा ताबा; २६ योजनांचे बांधकाम सुरू'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यात येत आहे. प्राधिकरण क्षेत्रातील आतापर्यंत ५४ योजनांमध्ये झोपडीधारकांना सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे.

या योजनांमध्ये एकूण ७,५४५ झोपडीधारकांचा समावेश असून, ९३७ पीएपी सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६९६ पीएपी सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. तसेच, २६ योजनांमध्ये झोपडपट्टी आणि विक्री इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या योजनांमध्ये ९,९७७ झोपडीधारकांचा समावेश असून, त्यांच्यासाठी ३,३९८ पीएपी सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दोन योजना मंजुरीच्या प्रक्रियेत असून, त्यामध्ये १,०६० झोपडीधारकांचा समावेश आहे.

प्राधिकरणाकडून केवळ नवीन योजना सुरू करण्यावर भर न देता पात्रता निश्चिती, पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, योजना मंजुरी, बांधकाम आणि लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देणे या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोपडीधारकांना कायमस्वरूपी घराचा मार्ग उपलब्ध होत आहे.

प्रलंबित योजनांनाही गती देण्याचे प्रयत्न

प्राधिकरण क्षेत्रातील सात योजनांमध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी असून, त्यामध्ये ३,२१५ झोपडीधारकांचा समावेश आहे. या योजनांसह विविध टप्प्यांवरील प्रकल्पांमधील अडचणी दूर करून पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरू आहे. झोपडीधारकांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे, रखडलेल्या योजनांना गती देणे तसेच विविध प्रशासकीय टप्प्यांवरील प्रस्तावांचा वेळेत निपटारा करणे, या उद्देशाने प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया सातत्याने पुढे जात आहे.

२२,९१८ झोपडीधारकांचे पुनर्वसन

झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे आणि संबंधित प्रस्तावांच्या प्रक्रियेलाही गती देण्यात येत आहे. सुमारे ५९ प्रस्ताव सध्या विविध टप्प्यांवर असून, त्यामध्ये तब्बल २२,९१८ झोपडीधारकांचा समावेश आहे. यापैकी ४० प्रस्तावांमध्ये स्वीकृत प्रस्ताव, स्वीकृतीचा ना-हरकत दाखला प्रलंबित असलेले प्रस्ताव, ठाणे महानगरपालिकेने पात्र केलेले प्रस्ताव तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित झालेले प्रस्ताव यांचा समावेश आहे. या प्रस्तावांमध्ये ११,७१८ झोपडीधारक आहेत. तर, १९ प्रस्तावांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यामध्ये ११,२०० झोपडीधारकांचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in