ठाण्यातील रस्ते खड्ड्यांच्या गर्तेत; ठाणेकर स्मार्ट रस्त्यांच्या प्रतीक्षेत

ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र मोठमोठे टॉवर, मेट्रोच्या उपक्रमातून दिसून येत आहे. मात्र स्मार्ट शहराचे रस्ते खड्ड्यात अडकल्याचे वास्तव पहावयास मिळत आहे. ठाण्यातील खड्ड्यांची समस्या प्रत्येक पावसात निर्माण होते आणि त्यावर तात्पुरते डांबराचा अन्यथा मास्टिक अस्फाल्टचा लेप लावून झाकूण टाकले जाते. यामुळे स्मार्ट शहराचे रस्ते कधी स्मार्ट होणार?
ठाण्यातील रस्ते खड्ड्यांच्या गर्तेत; ठाणेकर स्मार्ट रस्त्यांच्या प्रतीक्षेत
Published on

ठाणे : ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र मोठमोठे टॉवर, मेट्रोच्या उपक्रमातून दिसून येत आहे. मात्र स्मार्ट शहराचे रस्ते खड्ड्यात अडकल्याचे वास्तव पहावयास मिळत आहे. ठाण्यातील खड्ड्यांची समस्या प्रत्येक पावसात निर्माण होते आणि त्यावर तात्पुरते डांबराचा अन्यथा मास्टिक अस्फाल्टचा लेप लावून झाकूण टाकले जाते. यामुळे स्मार्ट शहराचे रस्ते कधी स्मार्ट होणार? याची प्रतीक्षा ठाणेकर करत आहेत.

ठाणे शहरातील मुख्य रस्ता असलेल्या घोडबंदर रोडची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. कासारवडवली, वाघबीळ, माजिवडा, ओवळा आदी ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भलेमोठे खड्डे पडले असून हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या गर्तेत अडकल्याचे पहावयास मिळत आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ठाण्यात पावसाची सुरुवात होताच रस्त्यांची दुरवस्था उघड होण्यास सुरुवात होते आणि यंदाही त्याला अपवाद राहिला नाही. यंदा अवकाळी पावसाने आधीच हजेरी लावल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था लवकर उजेडात आल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे ठाण्यात मोठमोठे टॉवर, मेट्रो, सुशोभीकरणाकडे राजकीय नेत्यांनी तसेच प्रशासनाने लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र या सगळ्या देखाव्याच्या मागे ठाणेकरांच्या मूलभूत गरजांकडे विशेषतः रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रश्नांकडे केवळ दुर्लक्षच होत आहे.

प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला पालिका आणि नेते यंदा खड्डेमुक्त ठाणे होईल, असे आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात पावसाळा संपेपर्यंतही रस्त्यांवरील खड्डे कायम राहतात. त्यामुळे या खड्ड्यांतून प्रवास करणे हे ठाणेकरांसाठी नेहमीचे झाले आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती करताना तात्पुरता डांबर अथवा मास्टिकचा लेप लावून काम उरकले जाते.

प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला यंदा ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार अशी दिवास्वप्ने पालिका आणि नेते दाखवत असतात मात्र प्रत्यक्षात पूर्ण पावसाळा गेला तरी खड्ड्यातून प्रवाशांची सुटका काही केल्या होत नसल्याची खंत प्रत्येक जण व्यक्त करत असतो.

कृतिशील पावले उचलण्याची गरज

शहराच्या विकासासाठी सौंदर्यीकरण महत्त्वाचे असले तरी नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, वाहतूक या मूलभूत सुविधा अधिक महत्त्वाच्या आहेत. प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी केवळ बॅनरबाजी आणि घोषणा न करता खऱ्या अर्थाने ठाणेकरांच्या व्यथा समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी कृतीशील पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा “खड्डेमुक्त ठाणे” ही घोषणा केवळ बोगस आश्वासन ठरून राहील.

दर पावसाळ्यात आश्वासनांचे मलम

स्मार्ट सिटी ही संकल्पना केवळ विकासकामांच्या घोषणांमध्ये अडकली आहे. मेट्रोचे खांब उभे राहात आहेत, बुलेट ट्रेनच्या स्वप्नांची चर्चा रंगते आहे, पण सामान्य ठाणेकराला आजही रस्त्यावरील खड्डे चुकवतच आपला प्रवास पार करावा लागतोय. प्रत्येक पावसाळ्याच्या तोंडावर आश्वासनांची सरबत्ती होते. “यंदा खड्डेमुक्त ठाणे” पण प्रत्यक्षात ठाणेकरांचा प्रवास खड्डे चुकवत होत असतो. रस्त्यांचे काम करताना तात्पुरत्या डांबराच्या थराने खड्डे बुजवले जातात. दोन पावसांनंतर हे थर उखडून पुन्हा पूर्ववत खड्डे समोर येतात. हे दृश्य ठाणेकरांना दरवर्षी नव्याने बघावे लागते. शहरातील विकासाचे दावे करणारे नेते, मात्र या समस्यांकडे फक्त आश्वासनांचे मलम लावून फुंकर मारतात. घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाची आणि राजकीय नेत्यांची उदासीनता स्पष्टपणे दिसते.

logo
marathi.freepressjournal.in