नवरात्रौत्सवासाठी लालपरी सज्ज; ठाणे एसटी विभागाची देवदर्शन पॅकेज टूर

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना विश्वासू साथ दिल्यानंतर आता नवरात्र उत्सवासाठीही ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. ठाणे एसटी विभागाने तुळजापूर, पंढरपूर, महालक्ष्मी मंदिर-डहाणू या प्रमुख देवस्थानांसाठी खास पॅकेज टूरची घोषणा केली आहे.
नवरात्रौत्सवासाठी लालपरी सज्ज; ठाणे एसटी विभागाची देवदर्शन पॅकेज टूर
Published on

ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना विश्वासू साथ दिल्यानंतर आता नवरात्र उत्सवासाठीही ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. ठाणे एसटी विभागाने तुळजापूर, पंढरपूर, महालक्ष्मी मंदिर-डहाणू या प्रमुख देवस्थानांसाठी खास पॅकेज टूरची घोषणा केली आहे. संगणकीय आरक्षण करून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के दरकपात तसेच लागू असलेल्या इतर सवलती मिळणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात ठाण्यातून २५०० हून अधिक बस सोडल्या होत्या. तशाच पद्धतीने नवरात्र उत्सवातही भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे एसटी विभागाने ही विशेष टूर सेवा सुरू केली आहे.

ठाणे आणि डहाणूतून यात्रेचे नियोजन

ही सेवा २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान रोज सकाळी ७ वाजता वंदना डेपोतून सुरू होईल. वंदना-तुळजापूर-पंढरपूर-ठाणे या मार्गावर जाणारी ही बस २२ सप्टेंबरच्या रात्री परत येईल. २८ सप्टेंबरपर्यंत अशाच पद्धतीने दररोज या यात्रांचे आयोजन होणार आहे. याशिवाय भिवंडी-महालक्ष्मी मंदिर (डहाणू) या मार्गावर देखील २२ ते ३० सप्टेंबर रोज सकाळी ७ वाजता सेवा सुरू राहील. या बसचा मार्ग भिवंडी-वज्रेश्वरी-गणेशपुरी-महालक्ष्मी मंदिर-डहाणू-जीवदानी मंदिर-विरार-भिवंडी असा असेल. परतीचा प्रवास त्याच दिवशी होईल.

logo
marathi.freepressjournal.in