Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत

विकासकांच्या दिरंगाईमुळे तब्बल १८ ते २० वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमुळे हजारो झोपडपट्टीधारक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.
Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत
Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत(Photo-X/@PratapSarnaik)
Published on

ठाणे : विकासकांच्या दिरंगाईमुळे तब्बल १८ ते २० वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमुळे हजारो झोपडपट्टीधारक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. विकासकांना प्रकल्प ताब्यात घेऊन वर्षानुवर्षे काम न करण्याची मुभा दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री तथा ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. काम करण्याची क्षमता नसलेल्या विकासकांकडून प्रकल्प काढून घेऊन ते सक्षम विकासकांकडे सोपविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात ओवळा-माजिवडा मतदारसंघातील एसआरएअंतर्गत येणाऱ्या ११ प्रकल्पांचा गुरुवारी आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित परवानग्या, विकासकांकडून झालेली कामाची प्रगती, रहिवाशांच्या तक्रारी आणि पुनर्वसनातील अडथळ्यांची माहिती घेण्यात आली. काही प्रकल्पांना तब्बल दोन दशके उलटूनही पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

विकासकांच्या दिरंगाईचा फटका झोपडपट्टीवासीयांना बसत असल्याने ‘विकासकांच्या निष्क्रियतेची शिक्षा नागरिकांनी का भोगावी?’ असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला.

११ प्रकल्पांतील अडथळ्यांची ‘सर्जिकल’ तपासणी

बैठकीत ११ प्रकल्पांचा स्वतंत्रपणे आढावा घेताना प्रलंबित परवानग्या, विकासकांची कार्यक्षमता, रहिवाशांचे प्रश्न आणि पुनर्वसनातील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित तसेच क्लस्टर पुनर्विकासाशी संबंधित प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. रखडलेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

काम नसेल तर प्रकल्प काढून घ्या

प्रकल्प पूर्ण करण्यात स्वारस्य नसलेल्या किंवा सातत्याने दिरंगाई करणाऱ्या विकासकांना नोटिसा देऊन नियमानुसार कार्यवाही करावी. त्यानंतरही कामाला गती न आल्यास संबंधित प्रकल्प काढून घेऊन सक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम विकासकाकडे सोपवावा, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसआरए योजनेचा मूळ उद्देश झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळवून देणे हा आहे. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्ष बांधकामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वर्षानुवर्षे आश्वासने ऐकून नागरिक थकले आहेत. आता त्यांना प्रत्यक्ष घर मिळणे महत्त्वाचे आहे. विकासकांच्या आडमुठेपणामुळे प्रकल्प रखडत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही.

प्रताप सरनाईक, आमदार ओवळा-माजिवडा मतदारसंघ

logo
marathi.freepressjournal.in