देशात पहिल्यांदा मुंबई आणि ठाणेदरम्यान रेल्वे धावली. त्या ऐतिहासिक घटनेला रविवारी १७० वर्षे पूर्ण होत आहेत. रविवारी ठाणे रेल्वे स्थानकाचा १७० वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे हे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्या घोषणा गेल्या दशकात वेळोवेळी करण्यात आल्या. भारतीय रेल्वेच्या अर्थसंकल्पातही याचा समावेश करण्यात आला. मात्र, याबाबत नंतर कोणत्याच हालचाली न झाल्याने या घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले आहे.
१६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणेदरम्यान पहिली रेल्वे धावली. सुरुवातीला गाडी धावताना बघून भुताटकी असल्याच्या संशयाने भारतीय लोक घाबरून पळायचे. मात्र, काही दिवसांनी ही भुताटकी नाही तर आपल्या उपयोगाचे साधन असल्याचे उघड झाल्याने ‘साहेबांचा पोर मोठा अकली रे, बिन बैलाची गाडी कसा ढकली रे’, असा गौरवही भारतीय लोक करू लागले हा इतिहास आहे. मात्र, त्यानंतर ज्या प्रमाणात भारतात रेल्वे विकसित होत गेली त्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास काही झाला नाही. ठाणे रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. मात्र, आजची या स्थानकाची दुरवस्था खूपच भयावह आहे. त्यात बदल करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू असतात, मात्र त्यालाही बऱ्याच मर्यादा आहेत.
आंतरराष्ट्रीय स्थानक बनवण्याच्या घोषणा हवेत
दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे साकारले जाणार असल्याचे घोषित होऊन जवळपास दहा वर्षे लोटली आहेत. त्यासाठीच्या खर्चाला रेल्वेने मंजुरी दिली होती. परंतु, या कामाचे घोडे कुठे अडले आहे हे कळायला मार्ग नाही. त्यानंतरही तत्कालीन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठाणे स्थानक, तसेच देशातील ज्या रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’च्या माध्यमातून तत्काळ विकास करण्याची योजना घोषित केली होती. त्यात ठाणे स्थानकाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप तरी याबाबतचे कोणतेही काम सुरू झालेले नाही.
सुरक्षेबाबत सावळागोंधळ
दुसरीकडे मुंबई तसेच ठाणे परिसराला अतिरेकी कारवायांचा धोका गेल्या काही वर्षांत वाढलेला आहे. तसेच मुख्यत्वे रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्टेशन परिसरालाच यापूर्वी अतिरेक्यांनी आपले लक्ष्य केले असल्यामुळे रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था अधिक कार्यक्षम करणे गरजेचे होते, मात्र याकडे देखील रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा ताण येथील पोलीस स्टेशनवर आहे. विशेष म्हणजे कळवा, मुंब्रा, दिवा ते दातीवली, ऐरोली या सर्वच परिसरात १२ रेल्वे स्टेशनची हद्द असलेल्या ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये पुरेसे पोलीस कर्मचारीही उपलब्ध नाहीत.
दररोजचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त
ठाणे रेल्वे स्थानकातून रोज अंदाजे ७ ते ८ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्याकडून ५० लाखांहून अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे या स्थानकाचे महिन्याचे उत्पन्न सुमारे २० कोटींच्या घरात असून, अंदाजे खर्च ७ कोटी असल्याने खर्चाच्या तुलनेत रेल्वेला महिना जवळपास तिप्पट उत्पन्न या स्थानकातून मिळत असल्याचे सांगण्यात येते.
ठाणे पूर्व स्टेशन परिसराचा होणार विकास
ठाणे पूर्व परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वे परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पाची मार्गिका ‘सॅटिस’ हा कोपरी पूल, सिद्धार्थनगर, रेल्वे स्थानक, बारा बंगला अशा भागांतून वळवण्यात आला आहे. त्यामुळे कोपरी परिसरात एकप्रकारे ‘सॅटिस’च्या मार्गाचे एक वर्तुळच उभे राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आली आहे. येताना हा मार्ग गुरुद्वारा, सिद्धार्थ नगर ते स्टेशन पूर्व तर जाताना ठाणे रेल्वे स्थानक पूर्व, मंगला हायस्कूल, एसईझेड, कोपरी मलनि:सारण प्रकल्प, वन विभाग कार्यालय परिसर आणि मुंबई-नाशिक द्रूतगती महामार्ग अशी ही मार्गिका असणार आहे. विशेष म्हणजे स्टेशन पूर्व परिसरात रेल्वे स्वतः खर्च करून आठ मजली इमारत बांधणार आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.