निर्बिजीकरणाची समस्या कायम; ठाणे पालिकेची भटक्या प्राण्यांबाबतची मोहीम निविदा आणि त्रुटींमध्ये अडकली

ठाणे शहरातील भटक्या श्वानांवर अद्याप महापालिकेस नियंत्रण मिळवता आलेले नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, उपचार तसेच मांजरीचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाची मोहीम निविदा आणि त्रुटीमध्ये अडकली असल्याचे समोर येत आहे.
निर्बिजीकरणाची समस्या कायम; ठाणे पालिकेची भटक्या प्राण्यांबाबतची मोहीम निविदा आणि त्रुटींमध्ये अडकली
Published on

ठाणे : ठाणे शहरातील भटक्या श्वानांवर अद्याप महापालिकेस नियंत्रण मिळवता आलेले नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, उपचार तसेच मांजरीचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाची मोहीम निविदा आणि त्रुटीमध्ये अडकली असल्याचे समोर येत आहे.

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, उपचार तसेच मांजरीचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या संदर्भात अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागविण्यात आले होते. यात संबंधित संस्थेला भटके कुत्रे आणि मांजरी देण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जाणार होते. तसेच त्यांच्यावर निर्बिजीकरण व लसीकरणाचा कार्यक्रम हा संबंधित संस्थेने त्यांच्याकडेच करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु या प्रस्तावात नमूद करण्यात आलेले दर हे २०१७ चे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याला प्रतिसादच मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मंजूर करण्यात आलेला हा प्रस्ताव आता गुंडाळण्यात आला असून नव्याने निविदा काढली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठाणे महापालिका हद्दीत २००४ ते २०१९ पर्यंत आठ कोटी खर्चून ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. त्यानंतर निर्बिजीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. परंतु मागील दोन वर्षांपासून निबिर्जीकरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यात २०२३ मध्ये ८००६ आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ४३०५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे, तर मागील वर्षी रेबीजचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घेण्यात आलेल्या मोहिमेत ७ हजार ४०९ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करणे, भटक्या मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण, भटके श्वान व मांजरीवर उपचार, रेबीज लसीकरण वार्षिक कार्यक्रम, प्राणी मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी माहिती प्रसारण करणे आदी गोष्टींचा समावेश होता.

महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी

हा प्रस्ताव तयार करीत असताना संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे यात टाकण्यात आलेले दर हे २०१७ मधील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या २०२५ सुरू असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही या प्रस्तावानुसार काही ठेकेदार पुढे देखील आले होते. परंतु त्यांनी आम्ही आमच्या ठिकाणी नेऊन निर्बिजीकरण किंवा लसीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, असे नमूद केले होते. तसेच मांजरीचे लसीकरण किंवा निर्बिजीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले.

नव्या प्रस्तावासाठी दीड वर्षांचा कालावधी

दरम्यान, पुन्हा नव्याने निर्बिजीकरणाची शस्त्रक्रियेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आरोग्य विभागाला तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यात दीड वर्षांनंतर पुढे आणण्यात आलेल्या प्रस्तावात देखील त्रुटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नव्या प्रस्तावानुसार भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबरोबरच प्रथमच शहरातील मांजरीचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागविण्यात आला होता.

५० हजार कुत्र्यांसाठी निविदा

प्रशासकीय महासभेत मंजूर झालेला प्रस्ताव रद्द करण्यात आला असून आता नव्याने निविदा काढण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रचलित दरानुसार निविदा काढली जाणार असून इतर तांत्रिक अडचणी देखील दूर केल्या जाणार आहेत. त्यानुसार शहरात ५० हजार भटके कुत्रे लक्षात घेऊन त्यानुसार निविदा काढली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in