
ठाणे : शहरातील वाढत्या भटक्या आणि मोकाट श्वान-मांजरींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ठोस निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या मंजुरीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी नसबंदी, रेबीज लसीकरण, उपचार आणि पकड मोहीम राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी १२ कोटी १६ लाख ९४ हजार २६३ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २६ लाख २८ हजार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार शहरात अंदाजे ५२ हजार भटके श्वान आणि मांजरी आहेत. सध्या महापालिकेकडे स्वतःचे प्राणी पकडण्याचे पथक नसल्याने नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे कठीण जात आहे.
पालिका प्रशासनाने ही योजना 'पशुजन्म नियंत्रण नियम २०२३' नुसार राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांना भटक्या प्राण्यांच्या त्रासातून दिलासा मिळण्याची आणि मानव-प्राणी सहअस्तित्वाचा समतोल राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन सत्रांमध्ये पकड मोहीम
या पार्श्वभूमीवर, प्रत्येक परिमंडळात दोन सत्रांमध्ये पकड मोहिमा राबविण्यासाठी ३० कुशल कामगार, दोन पर्यवेक्षक आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून, तिच्यामार्फत नसबंदी, लसीकरण आणि उपचाराची कामे केली जाणार आहेत. पहिल्या वर्षी सुमारे २.३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांच्या कालावधीत एकूण १२.१६ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च होईल. संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेऊन दरवर्षी कार्यादेश नूतनीकरण केला जाणार आहे.