

ठाणे : दहावीचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर जुन्या वादातून चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील दहीसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीफ साबीर शेख (१७) हा २ जून रोजी दहावीचा निकाल घेऊन घरी परतत असताना त्याला मेहफुस शेख याचा फोन आला. मेहफुसने हनीफला दहीसर येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार हनीफ हा त्याचा मित्र शेहबाज इमरान खान याच्यासह ठरलेल्या ठिकाणी गेला. तेथे मेहफुस शेख आणि त्याचे दोन मित्र उपस्थित होते. तक्रारीनुसार, भेट होताच मेहफुस आणि त्याच्या साथीदारांनी हनीफला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मेहफुसचे वडील मेहबुब शेख घटनास्थळी आले आणि त्यांनी हनीफचे दोन्ही हात पकडून धरल्याचा आरोप आहे. त्यानंतर मेहफुसने धारदार हत्याराने हनीफच्या छातीवर आणि पोटावर वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर हनीफ कोसळताच आरोपींनी खाली त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हनीफचा मित्र शेहबाज तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून त्याची सुटका केली. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.