
ठाणे : सुट्टीकाळात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांच्या खात्यात अर्जित रजा जमा होणार असून भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून ठाणे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
या निर्णयाचा फायदा ठाणे जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना होणार आहे. राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. दीर्घ सुट्टीच्या काळात प्रशिक्षण अथवा इतर कामासाठी शिक्षकांना बोलावल्यास त्या दिवसांची अर्जित रजांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत केली जाते. तथापि अनेक ठिकाणी अशा नोंदी केल्या जात नसल्याच्या तक्रारी अनिल बोरनारे यांच्याकडे शिक्षकांनी केल्या होत्या. यावर बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देऊन शिक्षकांना अर्जित रजा मिळावी व तशा नोंदी करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत शिक्षण उपसंचालकांनी व ठाणे शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले.
या आदेशात “ज्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी/निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) मधील वरील नियमानुसार कार्यवाही करावी,” असे आदेश दिल्याने या निर्णयाचा फायदा ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शेकडो शिक्षकांना होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.