

ठाणे : ठाणे शहरात उष्णतेचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून वाढत्या उन्हाच्या झळांनी नागरिकांची अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात उष्णतेचा तडाखा वाढल्याचे दिसून आले होते. त्या काळात तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत होते. त्यानंतर राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट होऊन पारा ३० ते ३२ अंशांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र, मार्च अखेर होत असताना पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत तापमान ३५ ते ३९ अंशांदरम्यान नोंदवले गेले असून शुक्रवारी दुपारी ते ३९ अंशांवर पोहोचले. दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांना प्रखर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम शहरांतील उष्णतेवरही होत आहे. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, अशक्तपणा तसेच श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
प्रखर सूर्यकिरणांमुळे डोळ्यांवरही परिणाम होऊन काही वेळा अंधारी येणे किंवा भिरभिरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
काही ठिकाणी ‘कृत्रिम सावली’चा दिलासा
ठाणे शहरात वाढत्या तापमानामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने ‘कृत्रिम सावली’चा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांतील सिग्नलवर शेड उभारून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुपारच्या कडक उन्हात सिग्नलवर थांबताना नागरिकांना प्रखर सूर्यकिरणांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचारी यांना या उष्णतेचा अधिक फटका बसत होता. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला असून सिग्नलवर उभारण्यात येणाऱ्या शेडमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांमध्ये टप्प्याटप्प्याने हे शेड उभारले जाणार असून, उन्हाळ्याच्या तीव्रतेतही नागरिकांना ‘कृत्रिम सावली’चा लाभ मिळणार आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. उन्हाच्या वाढत्या झळांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारच्या उपाययोजना राबवणे गरजेचे असून, ठाणे महापालिकेचा हा उपक्रम त्यादृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे.