
ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या विविध अनुदानात हात आखडता घेतला आहे. याचा फटका पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना बसणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ठाणे महापालिकेच्या विविध योजनांचा माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानात या आर्थिक वर्षात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. विविध योजनांसाठी करण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीपेक्षा लाभार्थींची संख्या वाढली असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून पालिकेच्या या निर्णयाविरोधात दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.
दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ठाणे महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २० पेक्षा अधिक योजना राबवण्यात येतात. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय अनुदान, दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान तसेच त्यांना उदरनिर्वाहासाठी हे अनुदान समाजकल्याण विकास विभागाच्या वतीने देण्यात येते. गेल्या वर्षीपर्यंत दिव्यांगांना विविध प्रकारच्या योजनांसाठी प्रत्येक वर्षी २४ हजार एवढे अनुदान दिले जात होते. गेल्या वर्षी लाभार्थीची संख्या ही १० हजारांच्या घरात होती, तर गेल्या वर्षी अनुदानाची तरतूद ही १४ कोटी रुपये करण्यात आली होती. मात्र या आर्थिक वर्षात लाभार्थींची संख्या ही १२ हजारांच्या वरती गेल्याने दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात करण्यात आली असून यावर्षी हे अनुदान केवळ १२ हजार रुपयेच देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या या निर्णयामुळे दिव्यांग संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे दिव्यांगांवर अन्याय करण्यासारखे असल्याचे दिव्यांग संघटनेचे म्हणणे आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा दिव्यांग संघटनेने दिला आहे.
तरतुदीएवढे लाभार्थी असल्यास १०० टक्के अनुदान
अनुदानात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय सरसकट सर्वच योजनांसाठी घेण्यात आलेला नाही. ज्या योजनांसाठी जेवढी तरतूद केली आहे त्याप्रमाणेच लाभार्थींची संख्या असेल तर त्या योजनेच्या अनुदानात कपात करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दिव्यांगांच्या जवळपास सर्वच योजनांमध्ये लाभार्थी संख्या वाढल्याने दिव्यांगांना दिल्या अनुदानात ही कपात करण्यात आली आहे.