नाट्यरसिकांसाठी कळव्यातील नाट्यगृहाचा मार्ग मोकळा.. ठाण्याला मिळणार तिसरे नाट्यगृह

सांस्कृतिक ठाणे शहराला तिसरे नाट्यगृह मिळणार असून कळवा येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाचा मार्ग मोकळा झाल्याने कळव्यात लवकरच नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : सांस्कृतिक ठाणे शहराला तिसरे नाट्यगृह मिळणार असून कळवा येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाचा मार्ग मोकळा झाल्याने कळव्यात लवकरच नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे.

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन त्यानंतर हिरानंदानी मेडोज भागात डॉ. काशिनाथ घाणेकर हे नाट्यगृह सुरू झाल्यानंतर आता मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले कळव्यातील नाट्यगृहाचा मार्ग आता मोकळा होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. कळव्यातील नाट्यगृहासाठी राज्य शासनाने ४० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यासंदभार्तील शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. हे नाट्यगृह १२ हजार ७०० चौरस मीटर आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणार असून तळघर, तळमजला अधिक २ मजली असे असणार आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात नाट्यगृह उभारणीचा निर्णय झाला होता. तसेच नाट्यगृहाच्या उभारणीसाठी कळव्यातील मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास राज्याच्या नगर विकास विभागाने हिरवा कंदील दाखविला होता. यामुळे मैदानाच्या जागेवर आता नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता.

मात्र, कालांतराने नाट्यगृहाचा प्रकल्प बारगळल्याचे चित्र दिसून आले होते. अशातच कळव्यातील नाट्यगृह उभारणीसाठी पालिकेने पुन्हा हालचाली सुरू केल्या असून या नाट्यगृह उभारणीबाबत मार्च २०२५ मध्ये पालिका मुख्यालयात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेतली. यात खारेगाव येथील प्रस्तावित नवीन नाट्यगृह प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे कळव्यात पुन्हा नाट्यगृहाच्या उभारणीच्या हालचाली सुरु झाल्याचे दिसून आले होते. असे असताना, शासनाने नुकताच शासन निर्णय काढीत कळवा येथील नाट्यगृहाच्या उभारणीसाठी ४० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

असे असणार नाट्यगृह

कळवा येथील खारेगाव परिसरातील ड्रामा थेअटर नावाने १२ हजार ७०० चौरस मीटरचा भूखंड नाट्यगृहासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या भूखंडावर हे नाट्यगृह उभारण्यात येणार असून ते तळघर, तळमजला अधिक दोन मजली असणार आहे. यामध्ये सुमारे ४५० ते ५०० व त्याहून अधिक आसन क्षमता असणार आहे.

नाट्यगृहातील सोयीसुविधा

असून नाट्यरसिकांच्या खानपानासाठी उपहारगृह देखील असणार आहे. तसेच वाहन पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये चार चाकी वाहनांसाठी १७५ तर, ८५ दुचाकी पार्क करता येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

१२ वर्षांपूर्वी घेतला होता निर्णय

खाडीपलीकडे असलेल्या कळवा, दिवा आणि मुंब्रा येथील नाट्यरसिकांना जवळ नाट्यगृह नसल्यामुळे ठाणे गाठावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून कळव्यात नवे नाट्यगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिकेने दहा ते १२ वर्षांपूर्वी घेतला होता. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड हे आग्रही होते.

logo
marathi.freepressjournal.in