तीन नवीन धरणांचा प्रस्ताव; ठाण्यासह सहा शहरांची तहान भागविण्यासाठी नियोजन; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांपुढे उभ्या राहिलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तीन धरणे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पोशिर धरणासह प्रत्येकी एक हजार एमएलडी क्षमतेची आणखी दोन धरणे प्रस्तावित आहेत.
गणेश नाईक
गणेश नाईक
Published on: 

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांपुढे उभ्या राहिलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तीन धरणे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पोशिर धरणासह प्रत्येकी एक हजार एमएलडी क्षमतेची आणखी दोन धरणे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि पनवेल या सहा शहरांना पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांवर पोहोचली असून, दररोज ६२१ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात उपलब्ध होणारा पाणीपुरवठा मागणीपेक्षा कमी असल्याने शहरातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घोडबंदर रोड, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातही पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. वाढते नागरीकरण आणि नव्या गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ही गरज लक्षात घेऊन पोशिर धरणासह आणखी दोन धरणे उभारण्याचा विचार पुढे आला आहे. प्रस्तावित नियोजनानुसार, एका प्रकल्पातून नवी मुंबईला ५०० एमएलडी पाणी देण्याची योजना आहे. उर्वरित पाण्याचे वाटप ठाण्यासह अन्य शहरांच्या गरजेनुसार करण्याचा विचार आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्यास संबंधित शहरांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी तंत्रज्ञान

मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबतही नाईक यांनी माहिती दिली. सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संभाव्य धोक्याच्या ठिकाणी सतर्कतेची यंत्रणा उभारण्यात येत आहे. वनविभाग, पोलीस आणि महसूल विभागाच्या समन्वयातून गावपातळीवर दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून देणार

उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे आपले मत असल्याचे नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याबाबत विचारले असता, ‘कोणी कोणाचे सांत्वन करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,‘ असे सांगत नाईक यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in