ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच; महिला ठार, पोलिसांसह तिघे जखमी

ठाणे शहर आणि परिसरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, तीन वेगवेगळ्या अपघातांत एका महिलेचा मृत्यू झाला, तर पोलीस कर्मचाऱ्यासह तिघे जखमी झाले आहेत.
ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच; महिला ठार, पोलिसांसह तिघे जखमी
ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच; महिला ठार, पोलिसांसह तिघे जखमी
Published on: 

ठाणे : शहर आणि परिसरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, तीन वेगवेगळ्या अपघातांत एका महिलेचा मृत्यू झाला, तर पोलीस कर्मचाऱ्यासह तिघे जखमी झाले आहेत. खारेगाव टोलनाका, ओवळा आणि गोकुळनगर येथे हे अपघात घडले. भरधाव वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली असून, ओवळा येथील अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून पसार झाला.

ओवळा येथे रविवारी मध्यरात्री रफीक सय्यद हे पत्नी रोशन यांच्यासह दुचाकीवरून घोडबंदर मार्गे मीरा रोडच्या दिशेने जात होते. त्यावेळी भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जखमी दाम्पत्याला ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रोशन यांची प्रकृती खालावली. पहाटे चारच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गोकुळनगर परिसरात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलाजवळ तिसरा अपघात घडला. अनोळखी रिक्षाचालकाने दुचाकीवरून जाणारे पोलीस कर्मचारी हनुमंत राकुसले यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले असून, उजव्या पायाच्या पंजालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर भांडुप येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या तिन्ही अपघातांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, अपघातास कारणीभूत वाहनचालकांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

दुचाकीला धडक

खारेगाव टोलनाक्याजवळ १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सतनामसिंग मथारू यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. कारचालकाने अचानक वेगात वळण घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप सतनामसिंग यांच्या पत्नी जसमीतकौर यांनी तक्रारीत केला आहे. या अपघातात सतनामसिंग यांच्या सहा बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)