Thane : ओल्या कचऱ्याबाबत व्यापारी आस्थापनांना तंबी; हॉटेल, मॉल, वाणिज्य आस्थापनांविरोधात पालिका आक्रमक, ७० आस्थापनांना महापालिकेची नोटीस

ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या जटिल होत असताना पालिकेने हॉटेल, मॉल व व्यापारी आस्थापना यांना रडारवर घेतले आहे. १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांना पालिकेने टार्गेट केले आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच परिसरात लावा, अन्यथा दंड भरा अशी तंबीच पालिकेने त्यांना दिली आहे.
Thane : ओल्या कचऱ्याबाबत व्यापारी आस्थापनांना तंबी; हॉटेल, मॉल, वाणिज्य आस्थापनांविरोधात पालिका आक्रमक, ७० आस्थापनांना महापालिकेची नोटीस
Published on

ठाणे : ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या जटिल होत असताना पालिकेने हॉटेल, मॉल व व्यापारी आस्थापना यांना रडारवर घेतले आहे. १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांना पालिकेने टार्गेट केले आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच परिसरात लावा, अन्यथा दंड भरा अशी तंबीच पालिकेने त्यांना दिली आहे.

लग्नसमारंभ कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल अशा ठिकाणी रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो, अशा आस्थापनांना बल्क वेस्ट जनरेटर म्हणून संबोधले जाते. अशा आस्थापनांनी कचऱ्याची विल्हेवाट आपल्या परिसरातच करण्याचे अपेक्षित आहे. बल्क वेस्ट जनरेटरचा कचरा महानगरपालिकेद्वारे वहन करणे अपेक्षित नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने पहिल्या टप्यात शहरातील ७० आस्थापनांना महापालिकेने नोटीस बजावली असून पुढील १५ दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु तसे न केल्यास दंडाच्या कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत रोज १ हजार मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यातही आजही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होतांना दिसत नाही. परंतु आता घनकचरा अधिनियमच्या अनुषंगाने महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरातील मोठ्या गृहसंकुलांना ओल्या कचऱ्याची प्रक्रिया त्याच ठिकाणी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच ज्या इमारतींना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारल्याचे दाखवून ओसी घेतली होती. त्यांची यादी देखील महापालिकेने तयार केली आहे. परंतु आता यापुढे जाऊन शहरातील मॉल, हॉटेल, लग्नसमारंभ कार्यालये, शैक्षणिक संस्था आदींसह इतर आस्थापनांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत अशा ७० आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

एक महिन्याची मुदत

संबधित आस्थापनांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबरोबरच त्यांच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले आहेत. यासाठी पुढील एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. परंतु त्यानंतरही संबधींत आस्थापनांनी प्रकल्प उभारला नाही तर मात्र त्यांच्या विरोधात दंडाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिला आहे.

घनकचरा विभागामार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. तसेच यापुढे जाऊन महापालिकेच्या माध्यमातून पुढील काही दिवसात मुख्यालयात असलेल्या कॅटींगमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या खताचा वापर येथील उद्यानात केला जाणार आहे. - मनीष जोशी, उपायुक्त घनकचरा विभाग

logo
marathi.freepressjournal.in