टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

ठाणेकरांचे डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर ठाणे परिवहन उपक्रम (टीएमटी) च्या ताफ्यात पहिली विद्युत वातानुकूलित डबलडेकर बस दाखल झाली आहे. गुरुवारी ही बस घोडबंदर येथील आनंदनगर आगारात पोहोचली असून सध्या तिच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल
टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल
Published on

ठाणे : ठाणेकरांचे डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर ठाणे परिवहन उपक्रम (टीएमटी) च्या ताफ्यात पहिली विद्युत वातानुकूलित डबलडेकर बस दाखल झाली आहे. गुरुवारी ही बस घोडबंदर येथील आनंदनगर आगारात पोहोचली असून सध्या तिच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत ही बस प्रवासी सेवेत दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त या बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना लवकरच डबलडेकर बसचा अनुभव घेता येणार आहे. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात पोहोचली असून शहरासाठी किमान १,३५० बसगाड्यांची गरज आहे. मात्र टीएमटीकडे सध्या केवळ ४०७बसगाड्या असून त्यापैकी ३८१ बसच प्रवासी सेवेत कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर बसची कमतरता भरून काढण्यासाठी प्रशासनाने मोठा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३७० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. यात १०० विद्युत वातानुकूलित बस (पीएम ई-बस योजना), १६० विद्युत बस (१५ वा वित्त आयोग), १०० सीएनजी बस आणि १० डबलडेकर ई-बस यांचा समावेश आहे. या सर्व बस वर्षाअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर टीएमटीच्या ताफ्याची एकूण संख्या ७७७ पर्यंत वाढणार आहे.

घोडबंदर रोडवर धावणार बस

ठाण्यातील बहुतांश रस्ते अरुंद आणि गर्दीचे असल्याने डबलडेकर बस सर्वत्र चालविणे शक्य नाही. मात्र घोडबंदर रोड हा रुंद आणि सरळ मार्ग असल्याने या बससाठी तो योग्य मानला गेला आहे. प्राथमिक स्तरावर ही बस ठाणे ते बोरिवली या मार्गावर चालविण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

मुंबईच्या डबलडेकरचा बसचा आनंद ठाण्यात

ठाण्यात प्रथमच अशा बस दाखल होत असल्याने शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुंबईच्या बेस्ट ताफ्यात असलेल्या आणि टीएमटीत दाखल झालेल्या बसेस एकसारख्याच असल्यामुळे प्रवाशांना मुंबईतील डबलडेकर बसचा अनुभव घेता येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in