

ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिकेची परिवहन सेवा अस्मार्ट असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र आता ठाणे परिवहन सेवेने देखील उशीरा का होईना, स्मार्ट परिवहन सेवेच्या युगात पाऊल टाकले आहे. ठाणे परिवहनने प्रवाशांचा प्रवास त्रासदायक आणि सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून सुटका करत एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. ‘माझी TMT’ मोबाइल ॲप आणि क्यू आर कोड सेवा या उपक्रमामुळे डिजिटल माध्यमातून तिकीट बुकिंग, वेळापत्रक तपासणी, मार्ग निवड आणि तक्रार नोंदणी यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
२०२० मध्ये ठाणे महापालिकेने शहरातील ५० प्रमुख बसस्थानकांवर डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स बसवण्यासाठी ४.७ कोटी रुपयांचा खर्च केला होता. या बोर्ड्सवर क्यूआर कोड्सही देण्यात आले होते, जे ‘माझी TMT’ ॲप डाऊनलोड करण्यासाठी वापरले जात आहेत. याशिवाय, २५० बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवून, सगळ्या बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हजुरी येथील कमांड आणि कंट्रोल सेंटर कार्यरत करण्यात आले आहे.
ही सेवा डिजिटल भारताच्या दिशेने एक पाऊल असून, भविष्यात आणखी सुधारित सुविधा ॲपमध्ये समाविष्ट करण्यात येतील.
आमचा उद्देश म्हणजे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि अनुभव या तिन्ही गोष्टींची बचत करणे हा असल्याचे टीएमटी प्रशासनाने म्हटले आहे. या सेवेला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली असून आतापर्यंत जानेवारी महिन्यात चार हजार १६ आणि फेब्रुवारी महिन्यात १४ हजार ९४४ असे एकूण १८ हजार ९६० जणांनी या ॲप्लिकेशनचा लाभ घेत तिकीट काढल्याचे समोर आले आहे.
सेवेची रूपरेषा
ठाणेतील प्रमुख बसस्थानकांवर आणि TMT बसगाड्यांमध्ये क्यू आर कोड लावण्यात आले आहेत.
प्रवासी या कोडला स्कॅन करून थेट ‘माझी TMT’ ॲप डाऊनलोड करू शकतात.
ॲपमधून ऑनलाईन तिकीट बुकिंग, बसची लाईव्ह लोकेशन, बस वेळापत्रक, मासिक पास खरेदी, व तक्रार नोंद यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
ही सेवा सध्या ठाण्याच्या ५० पेक्षा अधिक बसस्थानकांवर आणि २५० बसगाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
‘माझी TMT’ ॲपच्या प्रमुख सुविधा
कॅशलेस तिकीट बुकिंग: ऑनलाइन पेमेंटद्वारे तिकीट मिळते; सुट्या पैशांचा त्रास नाही.
बस ट्रॅकिंग: जीपीएस प्रणालीद्वारे बस कुठे आहे, किती वेळात येईल, हे मोबाईलवर पाहता येते.
डिजिटल पास: मासिक व वार्षिक प्रवास पास मोबाईलवरूनच काढता येतात.
तक्रार व्यवस्थापन: ॲपमधूनच तक्रारी नोंदवता येतात व त्यावर प्रतिसादही मिळतो.
ही सेवा १ जानेवारीपासून सुरू झाली असून आतापर्यंत १८००० ते २०००० प्रवाशांनी या ॲपचा लाभ घेतला आहे. या डिजिटल सेवेसाठी ठाणे पालिकेकडून कोणतेही अर्थसहाय्य घेण्यात आलेले नाही. ही सेवा ठाणे परिवहनच्या माध्यमातून देण्यात येत असून यासाठी एवन सॉफ्टवेअर कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये 'माझी टीएमटी' ॲप तसेच क्यू आर कोड, तिकीट, पास वगैरे सगळी प्रणाली एवन सॉफ्टवेअर कंपनी स्वत: राबविणार आहे. यासाठी त्यांना सरासरी महिन्याला १८ लाख दिले जातात.
- भालचंद्र बेहरे, परिवहन व्यवस्थापक