
ठाणे : ठाण्याची जीवनवाहिनी मानली जाणारी महापालिकेची परिवहन सेवा (टीएमटी) सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. समाजातील विविध घटकांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे टीएमटीचा तोटा वाढत चालला आहे.
ठाणेकरांना उत्तम व आरामदायी प्रवास मिळावा यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक सीएनजी व इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. उत्पन्न वाढीसाठी टीएमटी प्रशासनाने अनेक नवीन मार्गावर सेवा सुरू केली आहे. मात्र, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींमुळे प्रतिदिन ४ ते ५ लाखांचा तोटा होत असून, महिन्याकाठी तब्बल एक ते दीड कोटींचा बोजा प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
सन २०१५ पासून राजकीय कारणास्तव तिकीटदर वाढवले गेलेले नाहीत. सध्या टीएमटीला दिवसाला सरासरी २८ लाखांचे उत्पन्न मिळते. महिन्याला हे उत्पन्न ७ ते ८ कोटींच्या घरात पोहोचते. पालिका मालकीच्या ७४ बसेस असून त्यापैकी केवळ ४०च रस्त्यावर धावत आहेत. तर आनंदनगर येथून २४० डिझेल आणि १२३ इलेक्ट्रिक बसेस या ठेकापद्धतीवर सेवा देत आहेत. टीएमटीमध्ये सुमारे १,००० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनावर दरमहा १८ कोटी रुपये खर्च येतो. त्यात इंधन आणि देखभाल यासाठी होणारा खर्च गृहित धरता मिळणारे उत्पन्न व प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे आर्थिक तोटा अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
टीएमटी बस प्रवासी संख्या : ३ ते ३.२५ लाख
महिला प्रवासी संख्या : २० ते २५ हजार
दिव्यांग व विद्यार्थी संख्या : ८ ते १० हजार
ज्येष्ठ नागरिक संख्या : ३२ हजार