ठाणे : महापालिका क्षेत्रात आपला दवाखाना उपक्रमाला घरघर लागली असताना आपला दवाखान्याची जागा आता आयुष्यमान आरोग्य मंदिर घेणार आहे. टप्प्याटप्प्याने ३० ठिकाणी सुरू होणाऱ्या या आरोग्य केंद्रात गोरगरीबांना माफक दरात उपचार मिळणार आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत ३३ आरोग्य केंद्र, ६ प्रसूतिगृह, कळवा रुणालय तसेच पीपीपी तत्त्वावर तीन रुग्णालये कार्यरत आहेत. केंद्र शासनामार्फत महापालिका हद्दीत २०२१-२२ या कालावधीत १२ व २०२२-२३ या कालावधीत ५६ असे एकूण ६८ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजुर झाले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या ५१ जागा उपलब्ध झाल्या असून ६ केंद्र यापूर्वीच सुरू झाली आहेत. तसेच १० ठिकाणी दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते कार्यरत होणार आहेत. तसेच ५१ पैकी ३० जागांवर आता पोर्टा कॅबीनच्या माध्यमातून हे दवाखाने सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढण्यात आली असून त्याला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यातील एक निविदा आता अंतिम होणार असून त्यानंतर पुढील दोन महिन्यांत एकाच वेळेस ३० ठिकाणी हे आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना यामुळे मोफत उपचार मिळणार आहेत. यापूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना ठाण्यात राबविण्यात आली होती. त्यानुसार ४६ ‘आपले दवाखाने’ ठाण्यात सुरू झाले होते. परंतु ठेकेदाराचा करार येत्या जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे.