
ठाणे : ठाण्यात सहा महिन्यानंतर पुन्हा टोइंग व्हॅन सुरू करण्याचा हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु वाहतूक विभागाच्या या निर्णयाविरोधात दक्ष नागरिकांबरोबरच आता राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. भाजपने ही सेवा न सुरू करण्यासाठी वाहतूक विभागाला निवेदन दिले आहे. तर उद्धव सेना टोइंग व्हॅनविरोधात मैदानात उतरली आहे. त्यांनी देखील गुरुवारी वाहतूक विभागाला निवेदन देऊन याचा निषेध केला.
ठाण्यात मागील सहा महिन्यापासून टोइंग व्हॅन बंद होत्या. परंतु त्यामुळे कुठेही कसल्याही प्रकारची कोंडी झालेली दिसून आली नाही. आता मात्र वाहतूक विभागाकडून पुन्हा टोइंग व्हॅन सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दक्ष नागरिक अजय जया यांच्यासह संगम डोंगरे यांनी आवाज उठविण्यास सुरवात केली असून वाहतूक विभागाच्या या कृतीचा निषेध केला आहे.
ई-चलानची व्यवस्था आधीच सुरू असताना, मग टोइंग व्हॅनची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, स्टेशनवरून धावणाऱ्या शेअर ऑटोमध्ये ५-५ प्रवाशांना नेले जाते, मात्र त्यांच्यावर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा स्टँड बांधले गेले आहेत, जिथे चालकांची दादागिरी ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. कार डेकोर आणि इतर दुकानांच्या बाहेर बेकायदेशीर पार्किंग होत आहे, परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, किंवा कारवाई होतांना दिसत नाही. वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग धोरण लागू केले असतानाही त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे या समस्या आधी सोडव्यात, अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली आहे. एकूणच यावर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
उद्धव सेनेचा आंदोलनाचा इशारा
भाजपपाठोपाठ गुरुवारी उद्धव सेनेने देखील टोइंग व्हॅनच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला आहे. सायंकाळी उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन देत टोइंग व्हॅन सुरू करू नका, अशी भूमिका घेतली आहे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
भाजपकडून निवेदन
दक्ष नागरिक अजय जया यांच्यासह संगम डोंगरे यांनी आवाज उठविण्यास सुरवात केली असून वाहतूक विभागाच्या या कृतीचा निषेध केला आहे. तसेच ही सेवा सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दुसरीकडे दक्ष नागरिकांबरोबरच आता भाजपनेही वाहतूक विभागाच्या या कृतीविरोधात आवाज उठविला आहे. माजी शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे आणि सुनेश जोशी यांनी या संदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे.