
ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट विभागात सुरू असलेल्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामामुळे १४ ऑक्टोबरपर्यंत जड व मोठ्या वाहनांना या मार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी ११ ऑक्टोबरच्या रात्रीपासून लागू असून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत ठाणे–घोडबंदर राज्य महामार्ग (क्र. ४२) वरील गायमुख घाट विभागात भौमितीक सुधारणा व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी ‘X’ (ट्विटर) वर सांगितले. या भागातील खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ठाणे, मिरा-भाईंदर, वसई व विरार या भागात रोजच्या प्रवासात नागरिकांना याचा मोठा फटका बसतो आणि मनःस्ताप होतो. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गांची (Diversion Routes) व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, हलकी वाहने आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
घोडबंदर-ठाणे मार्गावरील पर्यायी मार्ग
पालघर–विरार दिशेहून येणाऱ्या वाहनांसाठी: शिरसाट फाटा → पारोळ → अकलोली (गणेशपुरी) → अंबाडी मार्गे प्रवास करावा.
पालघर–वसई दिशेहून येणाऱ्या वाहनांसाठी: चिंचोटी → कामन → खारबाव → अंजूरफाटा → भिवंडीमार्गे प्रवास करावा.
पश्चिम द्रुतगतीमार्ग (मुंबई / काशिमिरा) दिशेहून येणाऱ्या वाहनांसाठी: वर्सोवा ब्रिज → गुजरात महामार्ग → शिरसाट फाटा / चिंचोटी मार्गे प्रवास करावा.
ठाणे-घोडबंदर मार्गावरील पर्यायी मार्ग
ठाणे / मुंबई दिशेहून येणाऱ्या जड व मोठ्या वाहनांना ‘Y जंक्शन’ किंवा ‘कपूरबावडी’ येथे प्रवेशबंदी राहील. ही वाहने खारेगाव टोल नाका → मानकोली → अंजूरफाटा मार्गे प्रवास करू शकतील.
संतप्त नागरिकांचे ‘गरबा’ आंदोलन!
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी गायमुखजवळ कंटेनरच्या अपघातामुळे अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती. अनेक प्रवासी रस्त्यावर अडकले होते. यावर नाराजी व्यक्त करत काही नागरिकांनी थेट रस्त्यावर ‘गरबा’ खेळत अनोखा निषेध नोंदवला.
या मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चांगलेच संतप्त झाले आहेत.