ठाणे शहरातील कोंडी फोडण्याचा राजमार्ग; आनंद नगर-साकेत उन्नत मार्गास एमएमआरडीएची मान्यता

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्याची दुखणी राज्यातील इतर शहरांपेक्षा खूप वेगळी आहेत.
ठाणे शहरातील कोंडी फोडण्याचा राजमार्ग; आनंद नगर-साकेत उन्नत मार्गास एमएमआरडीएची मान्यता

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्याची दुखणी राज्यातील इतर शहरांपेक्षा खूप वेगळी आहेत. मुंबईत ज्या झपाट्याने जमिनीचे दर वाढले, त्या प्रमाणात फक्त अल्प उत्त्पन्न गटाचीच नव्हे, तर मध्यम वर्गीयांनीही आपल्या जागा विकून ठाण्याकडे धाव घेतली, तसेच राज्यातून आणि देशभरातून रोजगाराच्या शोधात येणाऱ्या नागरिकांनी याच परिसरात बस्तान बसवले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्यामुळे गेल्या दशकात ठाणे परिसरात जवळपास दुप्पट नागरीकरण वाढले, याचाच मोठा फटका वाहतुकीला बसला.

मुख्यतः मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना नाशिक तसेच पुण्याकडे जाण्यासाठी शहरातून जावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी सहन करावी लागते. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीए पुढे सरसावली असून आनंद नगर ते साकेत या दरम्यान उन्नत मार्गाचे निर्माण करण्यासाठी १२७५ कोटीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना शहरात न येता परस्पर शहराबाहेर जाणे शक्य होणार आहे, परिणामी शहरातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

जवळपास २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी रास्ता रुंदीकरण मोहीम घेऊन रस्ते मोठे करण्याचे प्रयत्न केले. पण प्रत्यक्षात रस्ते रुंद जरी झाले, असले तरीही रस्त्यांवरील दुतर्फा करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे शहरातील वाहतूककोंडी काही केल्या सुटली नाही. ठाण्यात प्रवेश करतानाच आलेल्या आनंद नगर टोल नाका पार करताना प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यात भर म्हणून की काय एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे एका दशकापासून कोपरी पुलाचे विस्तारीकरण रखडलेले होते, त्याचे काम आता अंतिम टप्प्यात असले तरी कोपराच्या पुढील सर्वच जंक्शन वाहतूक कोंडीच्या कचाट्यात सापडलेले असतात.

ठाण्यात संध्याकाळच्यावेळी कॅडबरी जंक्शन, विवियाना मॉल, सिनेवंडर आणि तीन हात नाका ही ठिकाणे वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. ठाण्यात रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या अधिक असे चित्र पहावयास मिळत आहे, तर दुसरीकडे वाहने पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालकांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना बाहेर पाडण्यासाठी शहरातील उपलब्ध रस्त्यांचा वापर करावा लागत असल्याने शहरात वाहतुकीची अवस्था अत्यंत भीषण आहे.

दरम्यान बोरीवली,मीरा -भाईंदर, वसई- विरार आणि अहमदाबाद महामार्गावर जाण्यासाठी ठाण्यातून घोडबंदर हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची मोठी वर्दळ असते. दुसरीकडे मुंबई, ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, पुणे, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून येणारी हजारो वहाने शहरातून जातात. मुळातच अरुंद रस्ते,परिसरात वाढलेली लोकवस्ती यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत असते. ही वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी कापुरबावडी नाका ते वाघबीळ या परिसरात चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे यामार्गावरून जलद गतीने जाण्यासाठी मदत होईल आणि वाहतूककोंडी कमी होईल अशी अपेक्षा करण्यात आली होती मात्र ती फोल ठरली आहे.

६.३ किमीचा उन्नत मार्ग

ठाणे शहरात आनंद नगर ते साकेत दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर उन्नत मार्गाचे निर्माण करण्यासाठी १२७५ कोटीच्या खर्चास एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या रस्त्याची लांबी ६.३ किमी असणार असून हा उन्नत मार्ग ३ अधिक ३ असा प्रशस्थ असणार आहे. यामुळे मुंबईकडून येणारी वाहने परस्पर जाणे सोयीस्कर होणार आहे. यामुळे शहरातील कोंडी कमी होणार असून प्रदूषणात घट होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in