ठाण्याचे रस्ते जाम, वाहतूक यंत्रणा सुस्त! बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त

स्मार्ट शहराच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या ठाण्यात वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाण्याचे रस्ते जाम, वाहतूक यंत्रणा सुस्त! बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त
ठाण्याचे रस्ते जाम, वाहतूक यंत्रणा सुस्त! बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्तप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : स्मार्ट शहराच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या ठाण्यात वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बेशिस्त पार्किंग, जुनाट सिग्नल यंत्रणा आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सिडको बसस्थानक ते दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह या मार्गावर अवघ्या एक-दोन मिनिटांच्या प्रवासासाठी २० ते २५ मिनिटे लागत असल्याने वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या मार्गावरून नवी मुंबई, कळवा, मुंब्रा आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. ठाणे परिवहन सेवा (टीएमटी), नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी) आणि खासगी कंपन्यांच्या बसची सतत ये-जा सुरू असते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.

महापालिका, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, बस व शेअर रिक्षांसाठी निश्चित थांबे तयार करावेत आणि रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन सुधारावे. स्मार्ट शहरात नागरिकांचा प्रवासही सुरळीत व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणा ठोस पावले कधी उचलणार, असा सवाल ठाणेकरांकडून उपस्थित होत आहे.

टोलेजंग इमारती, रस्ते अरुंदच!

ठाण्यात पुनर्विकास आणि टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असताना त्या परिसरातील रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा पुरेसा विचार केला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुन्या इमारतींच्या जागी मोठ्या गृहसंकुलांची उभारणी होत असली, तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी आणि वाहतुकीची क्षमता अपुरी आहे. खासगी बसचालकांकडूनही काही ठिकाणी रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र बसतळ किंवा निश्चित थांबे निर्माण करण्याची गरज आहे. याशिवाय, काही भागांत वाढलेल्या खाऊगल्ल्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि ग्राहकांची गर्दी यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. काही ठिकाणी या व्यवसायांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे आरोपही केले जातात. त्यामुळे अतिक्रमणांवर पक्षीय भेदभाव न करता कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दोन मिनिटांच्या प्रवासासाठी २० ते २५ मिनिटे खर्च करावी लागतात. पेट्रोल आणि वेळ दोन्ही वाया जात असून, वाहतूक नियोजनाचा फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. वाहतूक यंत्रणा जागी कधी होणार?

संतोष जोशी, दुचाकीस्वार

बेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला अडथळा

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होते. हॉटेल, बार, वाइन शॉप आणि व्यावसायिक आस्थापनांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने कोंडीत भर पडते. काही शाळा मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणारे पालकही रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे इतर वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी प्रभावी नियंत्रण ठेवणे अपेक्षित असताना, कारवाईतील असमानतेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाहतूककोंडीची प्रमुख ठिकाणे

रेल्वे स्थानक परिसर, जांभळी नाका, कॅडबरी रोड, कापूरबावडी, तीन हात नाका, घोडबंदर रोड, कळवा नाका, सिडको रोड

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in