Thane : वाहतूककोंडीविरोधात मनसेचा ट्रॅफिक मार्च; शनिवारी मोर्चा

ठाणेकरांना सतावत असलेल्या वाहतूककोंडीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वाहतूक विभागाला जाब विचारला. त्यानंतर येत्या शनिवारी ठाण्यातील वाहतूक समस्यांविरोधात ट्रॅफिक मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर मनसेच्या वतीने देण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणेकरांना सतावत असलेल्या वाहतूककोंडीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वाहतूक विभागाला जाब विचारला. त्यानंतर येत्या शनिवारी ठाण्यातील वाहतूक समस्यांविरोधात ट्रॅफिक मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर मनसेच्या वतीने देण्यात आली.

ठाण्यातील घोडबंदर रोड, भिवंडीकडून येणारे मार्ग यांसह बहुतेक रस्ते वाहतूककोंडीने ग्रासले आहेत. शहरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहतुकीवर बंदी असतानाही ठाण्यात अशा वाहनांची ये-जा सुरूच आहे, यावर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“अवजड वाहतूक आणि वाहतूक विभाग यांच्यात काय लागेबांधे आहेत, हे जाहीर करावे,” असे आव्हान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. रस्त्यावरील खड्डे, वाहतूककोंडी आणि त्यातही सीसीटीव्हीच्या माध्यमातून आकारला जाणारा दंड यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाणे परिसरातील अनेक शाळा मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर खासगी वाहन आणि स्कूलबसची गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाताना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा एक-एक तास वाहतुकीत अडकून पडल्याने पालकांचाही मौल्यवान वेळ वाया जातो.विद्यार्थी आणि पालक दोघेही वाहतूक समस्येमुळे त्रस्त आहेत. शाळेजवळील वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगची कमतरता आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आलो आहोत. सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चात पालक देखील स्वतः सहभागी होणार आहेत.

संदीप पाचंगे, सरचिटणीस मनविसे महाराष्ट्र राज्य

मनसेचे आवाहन

मनसेच्या माहितीनुसार, ट्रॅफिक मार्च हा ठाणे महापालिका मुख्यालयापासून सुरू होऊन तीनहात नाका येथे संपन्न होईल. या मोर्चामध्ये समस्त ठाणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिक यात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in