

ठाणे : मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख अलीकडच्या काळात ‘वाहतूककोंडीचे शहर’ अशी बनत चालली आहे, ही गंभीर बाब असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनांच्या झपाट्याने वाढणारी संख्या यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या साधारण १८ लाखांच्या घरात आहे. मात्र, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदीनुसार १६.५ लाख वाहने नोंदणीकृत आहेत. त्यामुळे ठाण्यात जवळपास प्रत्येक व्यक्तीमागे एक वाहन अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील प्रती माणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसून येत आहे. यामध्ये २ लाख ७८ हजार ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या १३ लाख ७२ हजार ६७९ इतकी आहे. अशा प्रकारे दिवसागणिक वाहने वाढत असून आजघडीला १६ लाख ५१ हजार ३८४ वाहने ठाण्यात धावत आहेत. या वाहनांव्यतिरिक्त १५ वर्षे कालावधी संपलेली बेकायदा वाहनेही उदंड आहेत. त्यामुळे अपुरी रस्ते सुविधा आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे भविष्यात ही कोंडी आपल्या घरापर्यंत पोहचण्याची भीती आहे. मुंबईनंतर वेगाने विकसित होणाऱ्या ठाणे शहरात ३८० किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये पूर्व द्रुतगती मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, तसेच अत्यंत वर्दळीचा घोडबंदर रोड यांचा समावेश होतो.मात्र, शहरांतर्गत असलेले अनेक रस्ते अरुंद व अपुरे आहेत. पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात, तर विविध व्यावसायिक वाहनांची अनियमित पार्किंगमुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसंख्येप्रमाणे वाहनांच्या संख्येत वाढ
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात टॉवरांची उभारणी होत आहे, त्याचबरोबर क्लस्टर, एसआरए यासारखे उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे ठाण्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या तीन वर्षांहून कमी कालावधीत ६ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाहने दुचाकींसह, रिक्षा, मालवाहू वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
अनेक विकासकामांमुळे वाहतूककोंडीचे ग्रहण
जुन्या ठाण्यात पार्किंगची समस्या अधिकच तीव्र असून, त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील कोंडीचा फटका संपूर्ण शहराला बसतो. गेल्या काही वर्षांत अनेक जुन्या इमारतींचे पुनर्विकास होऊन मोठ्या टॉवर बांधकामांना वेग आल्याने लोकसंख्येत आणि वाहनसंख्येत तब्बल पाचपट वाढ झाल्याचे वाहतूक विभागाचे निरीक्षण आहे. महापालिका, मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा विभाग आणि अन्य प्राधिकरणांमार्फत शहरात सुरू असलेली अनेक विकासकामांमुळे अनेकवेळा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या मदतीने पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत असले तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रस्ते व पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे वाहतुककोंडी बरोबरच धुळ व हवा प्रदूषणाची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून दैनंदिन जिवनात सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग केल्यास या समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल.
पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतुक शाखा, ठाणे शहर