

ठाणे : दहावी व बारावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मदत उपक्रम सुरू केला आहे. रस्त्यातील अडचणींमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा चुकू नये, यासाठी तब्बल ५४ 'रायडर्स' तैनात करण्यात आले असून हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, अचानक वाहतूककोंडी किंवा इतर आपत्कालीन अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर ५४ रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १८ वाहतूक युनिट्समार्फत संपर्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ट्राफिक कंट्रोलसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप आणि हेल्पलाइन क्रमांकही कार्यरत ठेवण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातही ३ वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
विशेष यंत्रणा कार्यरत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता १० वी) परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत इयत्ता १२ वीसाठी १२६ परीक्षा केंद्रे आणि इयत्ता १० वी साठी २२३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यात अडचण आल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी ही विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
वाहतूक पोलिसांचे हेल्पलाइन क्रमांक
विद्यार्थी किंवा पालकांनी अडचण निर्माण झाल्यास वाहतूक विभागाच्या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाइन क्रमांक ८२८६३००३००, ८२८६४००४०० तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ७०३९००३८६६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
संबंधित ठिकाणी तातडीने पोहोचून वाहतूक पोलिसांकडून मार्ग मोकळा करून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीपुरती उपलब्ध असणार असून, परीक्षा काळात पालकांनी व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून या उपक्रमाला सहकार्य करावे.
पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतूक विभाग