ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक टप्प्यात कॅडबरी सिग्नलजवळ बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांनी पहिल्याच दिवशी तब्बल ९५० नियमभंग करणारे चालक कैद केले. यात सर्वाधिक ४५३ दुचाकीस्वार - हेल्मेटशिवाय, तर ४२४ चालकांनी सिग्नल तोडले, ४२ जणांनी स्टॉप लाइन मोडली आणि इतर ३१ जणांनी विविध नियमांचे उल्लंघन केले, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
यातील २० चालकांनी दंडाची रक्कम त्याच दिवशी भरली आहे. नियम मोडणाऱ्यांना थेट त्यांच्या भ्रमणध्वनीवर दंडाची पावती (चलन) पाठविण्याची सुविधा यशस्वी ठरली आहे.
भरधाव वेग, सिग्नल मोडणे, हेल्मेटविना दुचाकी, सीट बेल्ट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे या योजनेद्वारे नियम मोडणाऱ्यांना जरब बसवली जाणार आहे. कॅडबरी सिग्नलवरील प्रयोग यशस्वी ठरल्याने इतर चौकांवरही लवकरच कॅमेरे कार्यान्वित होतील.
पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
२० सदस्यांचे विशेष पथक तयार
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा विचार करून हे पाऊल उचलले आहे. पुढील टप्प्यात शहरातील १५ महत्त्वाच्या चौकांवर असेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे सर्व कॅमेरे ठाणे वाहतूक पोलिसांच्या अद्ययावत नियंत्रण कक्षाशी जोडले जात असून, त्यावर नजर ठेवण्यासाठी २० सदस्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.