

ठाणे : नाताळ सणाच्या आनंदात ठाणे वाहतूक पोलिसांनी गुरुवारी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. कोपरी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चक्क सांताक्लॉजला रस्त्यावर उतरवत ‘सुरक्षित वाहतूक’चा संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवला.
दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकीवर हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावावा, तसेच वेगमर्यादा पाळावी, अशा महत्त्वाच्या सूचनांचा प्रसार सांताक्लॉजच्या माध्यमातून करण्यात आला. सणाच्या उत्साही वातावरणात दिलेला हा संदेश नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वीकारला.
वाहतूक शाखेचे पोलिस उपयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, बाराबंगला, नौपाडा-कोपरी रोड, गोखले रोड, आनंदनगर चेकनाका आदी ठिकाणी सांताक्लॉजसह वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनजागृती केली.
वाहतूक नियम हे दंडासाठी नसून जीव वाचवण्यासाठी आहेत, हा महत्त्वाचा संदेश या उपक्रमातून ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रभावीपणे दिला असल्याची माहिती कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
सांताक्लॉजला पाहून ‘बच्चे कंपनी’ विशेष आनंदित झाली. यावेळी सांताक्लॉजने मुलांना खाऊ वाटत नाताळचा आनंद साजरा केला. सणासुदीच्या काळातही सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम ठाणेकरांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे.