ठाणे : ठाणे शहरात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यात ठाणे शहर वाहतूक विभाग अपयशी ठरत आहे. परंतु प्रवाशांना सुविधा देण्याऐवजी, त्यांची वाहतूककोंडीतून सुटका करण्याऐवजी फक्त वाहन चालकांकडून वाढीव दंड आकारणी कशी करता येईल यातच अधिक तत्परता दाखवित असल्याचा मुद्दा उपस्थित करीत ठाणे शहर मनसेने तीनहात नाका येथील ठाणे शहर वाहतूक विभागाविरोधात आंदोलन केले. जो पर्यंत वाहतूककोंडीतून मुक्तता होत नाही, तो पर्यंत सीसीटीव्हीचे दंडाचे चलन बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ठाणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूककोंडी त्रास होत आहे. वाहतुक विभागाकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडत असून नियोजन असफल ठरत आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाणेकर नागरिकांना, वाहनचालकांना सुविधा देण्याची जबाबदारी देखील प्रशासनाचीच आहे. वाहतूक विभाग फक्त वाहनचालकांकडून वाढीव दंड आकारणी कशी करता येईल याविषयी तत्परता दाखवित असल्याचा आरोप यावेळी मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी केला. ठाणे शहरात कुठूनही प्रवेश केला तरी दोन-दोन, तीन-तीन तास वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागते. वाहनचालकांना शिस्त पाळण्याबद्दल अनास्था नाही, परंतु ज्या प्रमाणात सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत आणि केवळ एकतर्फी नियम पालनाची सक्ती केली जाते हे मान्य केले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
... तर मोर्चा निघेल!
वाहतूक विभाग आपली सर्व कार्यकुशलता वाहन चालकांना नियम पालनाच्या नावाखाली दंड आकारण्यासाठी वापरत आहे. यातली थोडी जरी कार्यकुशलता प्रामाणिकपणे नागरी सेवा, नागरी सुविधा देण्यासाठी वापरली तर बरे होईल. वाहतूककोंडीवर उपाययोजना करावी आणि मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावे अन्यथा कधीतरी वाहनचालकांच्या संयमाचा बांध तुटू शकतो आणि ठाणेकर रस्त्यावर उतरून मोर्चा काढतील असा इशाराही यावेळी मनसेने दिला.