
ठाणे : वेतनवाढीसाठी ठाणे परिवहन सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ठाणेकर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अचानक केलेल्या संपामुळे कामावर जाणाऱ्या तसेच कामावरून आलेल्या नागरिकांना मोठा फटका बसला. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांएवढेच आमच्याकडून काम करून घेता किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढे तरी वेतन द्या, अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी टीएमटी प्रशासनाकडे केली आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ४७४ बसगाड्या आहेत. त्यापैकी ३९० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. त्यापैकी २४० बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येत असून या ठेकेदाराकडे बसगाड्यांच्या संचलनासाठी ५५० वाहनचालक, २०० पुरुष वाहक, १५० महिला वाहक, १५० वाहन दुरुस्ती आणि सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांच्या विविध मागण्या असून त्यात वेतनवाढ ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेले काही महिने ते संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्यावर कोणताच निर्णय होत नसल्यामुळे वाहकांनी मंगळवारी पहाटेपासून संप पुकारला आहे.
ठोक मानधन ३५ हजार इतके द्यावे. वार्षिक पगार वाढ दोन हजार रुपयांनी करावी. कुठल्याही कामगारांना दंड आकारला जाऊ नये. प्रत्येक कामगारांचा अडीच लाखांचा आरोग्य विमा (मेडीक्लेम) काढण्यात यावा. वर्षातील २२ सुट्ट्या भरपगारी देण्यात याव्यात. ७ ते १० तारखेच्या आत वेतन देण्यात यावे आणि सण असल्यास लवकर वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संप पुकारला आहे. आम्हाला जेवढे वेतन मिळायला हवे, तेवढे वेतन मिळत नाही. महागाई वाढत असून त्या तुलनेत मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. कंपनीला वारंवार निवेदन देऊनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगारांनी संप पुकारला आहे.