

ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या परिवहन सेवेत लवकरच मोठी भर पडणार असून येत्या दिवाळीपर्यंत १०० सीएनजी, १०० इलेक्ट्रिक आणि १० डबलडेकर अशा एकूण २१० नव्या बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार पहिली डबलडेकर बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. सध्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३६० बस असून त्या ठाण्यासह बोरिवली, मुंबई, भिवंडी आदी मार्गांवर धावत आहेत. यापैकी १२३ बस या वातानुकूलित इलेक्ट्रिक बस आहेत. या बसमधून दररोज सुमारे २ लाख ३० हजार प्रवासी प्रवास करत असून परिवहन विभागाला दररोज सुमारे २४ ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आधीच १२३ इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाल्या असून आणखी १०० इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यापैकी पहिल्या २५ बस जून महिन्यात सेवेत येणार आहेत.
डबलडेकर बसचा मार्ग मोकळा
दोन वर्षांपूर्वी परिवहनच्या अर्थसंकल्पात डबलडेकर बसचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आता त्याची अंमलबजावणी सुरू होत असून वर्षभरात १० डबलडेकर बस दाखल होणार आहेत. पहिली बस ठाणे ते घोडबंदर मार्गावर मे महिन्यात धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीएनजी बसचाही समावेश
पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दृष्टीने १०० सीएनजी बस देखील टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत सर्व २१० बस पूर्णपणे सेवेत दाखल होतील, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली डबलडेकर बस सेवेत येईल. त्यानंतर सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होत जाऊन दिवाळीपर्यंत सर्व बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक ठाणे परिवहन