ठाणे परिवहनला मिळणार बळ; ३६० पर्यावरणपूरक बस २०२७ पर्यंत दाखल होणार

ठाणेकरांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने बस ताफा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार येत्या मार्च २०२७ पर्यंत परिवहन सेवेत एकूण ३६० पर्यावरणपूरक बस दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे.
ठाणे परिवहनला मिळणार बळ; ३६० पर्यावरणपूरक बस २०२७ पर्यंत दाखल होणार | (संग्रहित छायाचित्र)
ठाणे परिवहनला मिळणार बळ; ३६० पर्यावरणपूरक बस २०२७ पर्यंत दाखल होणार | (संग्रहित छायाचित्र)Photo : X
Published on

ठाणे : ठाणेकरांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने बस ताफा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार येत्या मार्च २०२७ पर्यंत परिवहन सेवेत एकूण ३६० पर्यावरणपूरक बस दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे. यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा समावेश असल्याने प्रवाशांना अधिक सुखद व गारेगार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली असून सार्वजनिक वाहतुकीची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र उपलब्ध बससंख्या तुलनेने कमी असल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहन, रिक्षा किंवा इतर पर्यायांचा वापर करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन प्रशासनाने बस ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत यापूर्वी ठाणे परिवहन सेवेत १२३ इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहेत. या बसमध्ये १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या बसचा समावेश आहे. या बसमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच प्रदूषणमुक्त वाहतुकीचा लाभ मिळत आहे.

दरम्यान, नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये परिवहन विभागाकडून आणखी बस खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पीएमई योजनेंतर्गत १०० इलेक्ट्रिक बस, १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून १६० बस आणि महापालिकेच्या परिवहन विभागाकडून १०० सीएनजी बस घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बस टप्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार असून मार्च २०२७ पर्यंत एकूण ३६० बस उपलब्ध होतील, असा विश्वास परिवहन प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या नव्या बसमुळे शहरातील विविध मार्गावर बसफेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे. तसेच प्रवाशांना कमी वेळात आणि अधिक सोयीस्कर सेवा मिळेल, असा दावा परिवहन विभागाने केला आहे.

यापूर्वीही कळवा आणि वागळे आगारातील ३३ जुन्या बसांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता. या लिलावात दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू येथील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्या लिलावातून परिवहन सेवेला सुमारे ८७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या निधीतून काही बससाठी आवश्यक स्पेअर पार्ट खरेदी करून काही बस पुन्हा दुरुस्त करण्यात आल्या होत्या.

परिवहन सेवेत १५ वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या काही जुन्या डिझेल बस आता सेवाबाह्य करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार १७जुन्या बसांचा ऑनलाइन लिलाव नवीन आर्थिक वर्षात करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. आवश्यक शासकीय परवानग्या मिळाल्यानंतर ही लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल.

भालचंद्र बेहेरे, व्यवस्थापक ठाणे परिवहन सेवा

logo
marathi.freepressjournal.in