ठाणे-उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; ठाण्यात सहा ठिकाणी लागल्या आगी, उल्हासनगरमध्ये मध्यरात्री खुर्ची फॅक्टरीला भीषण आग

दिवाळीच्या उत्साहातच ठाणे आणि उल्हासनगरकरांना आग लागल्याच्या घटनांनी धक्का दिला. ठाण्यात पहिल्याच दिवशी सहा ठिकाणी आग लागली, ज्यात बहुतेक ठिकाणी फटाक्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
ठाणे-उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; ठाण्यात सहा ठिकाणी लागल्या आगी, उल्हासनगरमध्ये मध्यरात्री खुर्ची फॅक्टरीला भीषण आग
Published on

दिवाळीच्या उत्साहातच ठाणे आणि उल्हासनगरकरांना आग लागल्याच्या घटनांनी धक्का दिला. ठाण्यात पहिल्याच दिवशी सहा ठिकाणी आग लागली, ज्यात बहुतेक ठिकाणी फटाक्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. उल्हासनगरमध्ये मध्यरात्री खुर्ची फॅक्टरीला भीषण आग लागली, ज्यामुळे लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तरीही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्काळ प्रयत्नांमुळे मोठे अनर्थ टळले, मात्र नागरिकांनी फटाके फोडताना आणि विद्युत यंत्रसामग्री वापरताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे : दिवाळीच्या आनंदात ठाणेकरांना पहिल्याच दिवशी आगीच्या घटनांचा धक्का बसला. सोमवारी रात्री ठाणे शहरातील विविध भागांत तब्बल सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी पाच घटना रात्री आठ ते दीड वाजण्याच्या दरम्यान झाल्या. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार यापैकी बहुतांश आगी फटाक्यांमुळे लागल्याचे समोर आले आहे.

वागळे इस्टेट रोड क्र. ३३ येथील अंबिकानगर भागात आदर्श ऑटो पार्ट्स या गॅरेजला सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.

मुंब्रा परिसरातील बाबाजी पाटील वाडी येथे एका मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला रात्री आठच्या सुमारास आग लागली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली गेली. ही आगही फटाक्यांमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील बॅसिलिअस टॉवरच्या ३१व्या मजल्यावरील घरात रात्री साडेदहा वाजता आग लागली. अग्निशमन दलाने २० मिनिटांत आग नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र सोफा व लाकडी साहित्य जळाले.

खोपट परिसरातील मे जयकार डेकोर दुकानाच्या छतावर ठेवलेल्या प्लास्टिक ताडपत्रीला मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास आग लागली होती. अवघ्या दहा मिनिटांत ही आग विझवण्यात आली. दरम्यान, वर्तकनगरमधील हब टाऊन रेसिडेन्सी येथील एका बंद फ्लॅटमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशिनला आग लागली होती. तसेच कळव्यातील विटावा स्मशानभूमी शेजारी साचलेल्या कचऱ्यालाही सोमवारी पहाटे आग लागली होती. या दोन्ही घटनांमध्येही सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

या सर्व घटनांची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे मोठे अनर्थ टळले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले की, 'फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी,' असे आवाहन करण्यात आले आहे.

उल्हासनगरमध्ये लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ४ येथील मराठा सेक्शन परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुर्ची निर्मिती फॅक्टरीला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण फॅक्टरीला वेढा घातला.

आगीचे लोट इतके प्रचंड होते की काही मिनिटांतच परिसर धुराच्या जाड ढगांनी व्यापला. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दलाने जवळपास काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग नियंत्रणात आणली. तथापि, तोपर्यंत फॅक्टरीतील सर्व साहित्य, तयार माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सविस्तर तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in