वाहनांच्या गर्दीत हरवले ठाणे! २०२३ मध्ये ठाण्यात साडेपाच लाख वाहन खरेदींची नोंद

काही वर्षांपूर्वी ठाण्यातील अरुंद रस्ते आणि बोळातून फिरणारे टांगे हेच चित्र ठाण्यात दिसत असे. ठाणे शहराची लोकसंख्या आणि प्रसिद्धी ज्याप्रमाणे वाढत गेली त्याचप्रमाणे त्याचा विकास देखील होत गेला.
वाहनांच्या गर्दीत हरवले ठाणे! २०२३ मध्ये ठाण्यात साडेपाच लाख वाहन खरेदींची नोंद
Published on

- अतुल जाधव

ठाणे दर्पण

काही वर्षांपूर्वी ठाण्यातील अरुंद रस्ते आणि बोळातून फिरणारे टांगे हेच चित्र ठाण्यात दिसत असे. ठाणे शहराची लोकसंख्या आणि प्रसिद्धी ज्याप्रमाणे वाढत गेली त्याचप्रमाणे त्याचा विकास देखील होत गेला. ठाण्यात अरुंद रस्ते प्रशस्त झाले. मात्र त्यामुळे वाहतूककोंडी दूर होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ठाण्यातील नागरिक वाहतूककोंडीमुळे बेजार झाले आहेत. कधी काळी मर्यादित असलेल्या ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. कधी काळी घोड्याचा टांगा हेच वाहतुकीचे प्रमुख असलेल्या ठाणे शहराची वाटचाल मेट्रोच्या दिशेने सुरू असून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणत वाहनांची संख्या देखील वाढत आहे.

ठाणे शहरात वाढत असलेली वाहनसंख्या वेगवेगळ्या समस्यांना आमंत्रण देत असून वाहनांच्या वाढत्या रेट्यामुळे शहरातील वाहतुकीवर देखील कमालीचा ताण येत आहे. २०२३ मध्ये एमएमआरडीए क्षेत्राचा विचार केला तर सर्वाधिक वाहने ठाणे शहरात नोंदली गेली असून ठाण्यात साडेपाच लाखांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सन २०२३ मध्ये तब्बल साडेपाच लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. खासगी बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज देण्यास सुरुवात केल्यामुळे वाहन घेणे शक्य होत आहे. त्यामुळे स्वत:चीच वाहने खरेदी करण्याचा कल आहे. काही वर्षांपूर्वी दसरा, दिवाळी यांसारख्या मोठ्या सणालाच नवीन गाड्या खरेदी करण्याची प्रथा आजकाल नाहीशी होत असल्याचे दिसत असून प्रत्येक दिवशी वाहनांची खरेदी जोमात होत असल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहेत. कोरोनानंतर वाहन खरेदीला मध्यमवर्गाची सर्वाधिक पसंती मिळत आहे. ठाणे शहरात एक लाख १२,२०७ वाहने, कल्याण येथे ७९,३१७ गाड्यांची आणि वसई भागात ८२,३५७ इतक्या वाहन खरेदीची नोंद झाली आहे.

जुन्या वाहनांची खरेदी-विक्री जोरात

वाहनांची वाढती संख्या यामुळे वातावरणात घातक वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सर्वच वाहने १५ वर्षानंतर जुनी झाल्यानंतर ती चालवण्यासाठी अयोग्य असल्याचे सर्वज्ञात असताना देखील जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, मुरबाड, नवी मुंबई, उल्हासनगर, शहापूर येथे आहेत. त्यामुळे अयोग्य झालेली वाहने वापरून ‘ती’ रस्त्यावर चालवण्याची मानसिकता पर्यावरणाच्या मुळावर आली आहे.

वाहनांसाठी बँकाचे सुलभ अर्थसहाय्य

वाहन कर्ज देणाऱ्या बँका त्याचप्रमाणे इतर अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था यांनी वाहन कर्जासाठी लवचिक धोरण स्वीकारल्याने गाड्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. लोकांची मागणी आणि त्याला बँकेचा मिळत असलेला प्रतिसाद, वाहन कर्ज प्रक्रियेत मागील काही वर्षात आलेला सुटसुटीतपणा आल्यामुळे एकाच घरात प्रत्येकाची एक गाडी याप्रमाणे अंगणात गाड्या उभ्या राहत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in