ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

ठाण्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. साडेचार लाख मतदारांची संशयास्पद वाढ, विरोधकांची नावे याद्यांतून गायब, काही मतदारांची नावे पूर्णपणे चुकीच्या प्रभागात, तसेच अनेक नोंदी अपूर्ण अशा अनियमितता असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप
ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोपछायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : ठाण्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. साडेचार लाख मतदारांची संशयास्पद वाढ, विरोधकांची नावे याद्यांतून गायब, काही मतदारांची नावे पूर्णपणे चुकीच्या प्रभागात, तसेच अनेक नोंदी अपूर्ण अशा अनियमितता असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत थेट महानगरपालिकेतील निवडणूक विभागाच्या कार्यालयात धडक दिली. मात्र तेथे निवडणूक अधिकारी बाळू पिचड कामावर उपस्थित नसल्याचे समोर आले. फोनवर संपर्क साधल्यावर ते लग्नाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे कळल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष रवी मोरे यांनी सांगितले की, ठाण्यात मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असून निवडणूक आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून काम करत आहे.

निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आहे. या पत्रकार परिषदेत मोरे यांनी अनेक ठिकाणी चुकीची नावे आणि हरवलेले फोटो, ऑनलाइन याद्या अपूर्ण, प्रत्यक्ष पडताळणी न करता याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप करत दुबार नावे मोठ्या प्रमाणात असून विरोधकांची नावे जाणीवपूर्वक वगळण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर मोरे यांनी ठाण्यातील मतदारसंख्या अचानक साडेचार लाखांनी वाढली कशी? एका शहराची एवढी क्षमता नाही, मग ही नावे आली कुठून ? हे जाणूनबुजून केलेले कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक सुधीर भगत यांचे नाव यादीतून गायब असल्याचे दिसून आले. तसेच शिंदे गटाचे पांडुरंग पाटील यांच्या नावाची तीन वेगवेगळ्या याद्यांमध्ये नोंद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

महानगरपालिकेतील निवडणूक विभागाच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग नकाशा आणि मतदार यादीत मोठी तफावत असल्याचे मनसेने म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्या बनवल्या गेल्या असून यामागे निवडणूक यंत्रणेचे संगनमत असल्याचा मनसेने आरोप केला आहे.

आंदोलनाचा इशारा

या अनियमिततेविरोधात सोमवारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला. निवडणूक अधिकाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. पत्रकार परिषदेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयातील निवडणूक विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक अधिकारी बाळू पिचड गैरहजर असल्याने संतापाचा उद्रेक झाला. योगायोगाने ते लग्नात असल्याचे समोर येताच रवी मोरे, पुष्कर विचारे आणि अन्य कार्यकर्त्यांनी कार्यालयातच घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

logo
marathi.freepressjournal.in