

ठाणे : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीवरून महाविकास आघाडीकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. ठाणे महापालिकेनेच आता महापालिका हद्दीत ८३ हजार ६४४ दुबार नावे असल्याचे जाहीर केले आहे. परंतु या दुबार मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी ठाणे मनपाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार याची माहिती सोशल मीडियावर दिली असून प्रभाग समितीत अर्ज ठेवले आहेत. ज्यांची दुबार नावे असतील त्यांनी दोनपैकी कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहेत, ते भरून द्यावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांची संख्या होती. आता मतदारांची ही संख्या ४ लाख २१ हजार २६१ ने वाढली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांची आताची संख्या ही १६ लाख ४९ हजार ८६७ झाली आहे. त्यानुसार १० डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तरीही हरकती सूचनांचा या कालावधीत पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे सादर झालेल्या प्रारुप मतदार यादीतील घोळावरून मनसेने महापालिकेला दोन वेळा लक्ष केले होते. त्यानंतर उबाठाचे माजी खासदार राजन विचारे यांनी दुबार नावावरून महापालिकेला धारेवर धरले होते.
आता ठाणे महापालिकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दुबार नावांची संभाव्य यादीच जाहीर केली आहे. त्यानुसार या यादीत ८३ हजार ६४४ नावे दुबार असल्याचे दिसून आले आहे.
मनपाने दुबार नावांची झालेली चुक मान्य केल्याचेही दिसून आले आहे. दुसरीकडे आता महापालिकेने सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून ज्यांनी दुबार नावे असतील त्यांनी प्रभाग समितीमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले. प्रभाग समितीमध्ये अर्ज ठेवण्यात आले आहेत. त्या अर्जावर दुबार मतदार कोणत्या ठिकाणी मतदार करणार आहे, हे त्याने त्यात भरून द्यावे लागणार आहे. त्यानुसार त्याला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.
जे मतदार अर्ज भरणार नाहीत, त्यांच्या मतदान यादीतील नावापुढे दुबार असा शिक्का मारला जाणार आहे. परंतु मतदानाच्या दिवशी असा व्यक्ती जर मतदान करण्यासाठी आला तर त्याचे जागेवर हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.