

ठाणे : ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अखेर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ४ ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी शिवसेना (शिंदे), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि एमआयएमने आपले उमेदवार रिंगणात उतरवले. महापालिकेतील संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेने सात प्रभाग समित्यांवर दावा ठोकल्याने नऊपैकी सात समित्यांवर शिंदेसेनेचे वर्चस्व प्रस्थापित होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर, सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडी पार पडल्या. मात्र, स्थायी समितीसह विविध समित्या आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर प्रशासनाने या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार ४ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली असून, ३१ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
मुंब्य्रात ‘एमआयएम’ने वाढवली रंगत
मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दीपाली भगत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीत एमआयएमनेही उडी घेतल्याने मुंब्य्रातील राजकीय समीकरणे अधिक रंजक झाली आहेत. महापालिका निवडणुकीत एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळाच्या आधारावर एमआयएमकडून नफीस अन्सारी यांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दीपाली भगत विरुद्ध नफीस अन्सारी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
शिंदेसेनेचा ‘महिला फॉर्म्युला’
शिंदेसेनेने सातपैकी तब्बल पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये महिला नेतृत्वाचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर आणि कळवा या पाच समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रभाग पातळीवरील महापालिका कारभारात महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
संख्याबळ शिंदेसेनेकडे
शिंदेसेनेने सात समित्यांवर दावा केला असला तरी निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदान आणि राजकीय ‘जुळवाजुळव’ यामुळे शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः मुंब्रा समितीच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीमुळे उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ४ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीत शिंदेसेनेचा दावा प्रत्यक्षात किती समित्यांवर यशस्वी ठरतो आणि विरोधक त्यांना कुठे धक्का देतात, याकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिंदेसेनेचे सात उमेदवार
महापालिकेतील संख्याबळाचा पुरेपूर फायदा घेत शिंदेसेनेने सात समित्यांवर दावा केला आहे. नौपाडा-कोपरीसाठी मीनल संखे, वागळे इस्टेटसाठी एकता भोईर, लोकमान्य-सावरकरनगरसाठी निर्मला कणसे, वर्तकनगरसाठी जयश्री जेरी डेव्हिड, माजीवाडा-मानपाड्यासाठी सिद्धार्थ ओवळेकर, दिव्यासाठी दीपक जाधव आणि कळव्यासाठी विजया लासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भाजपने उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना मैदानात उतरवले आहे.