ठाण्याला पावसाने झोडपले! रेल्वे स्थानकात प्रवाशांची झुंबड, वाहतुकीचा बोजवारा; डोंबिवलीकरांचेही हाल

ठाणे जिल्ह्यात रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला
ठाण्याला पावसाने झोडपले! रेल्वे स्थानकात प्रवाशांची झुंबड, वाहतुकीचा बोजवारा; डोंबिवलीकरांचेही हाल
Published on

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला. तर सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. सलग झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर सोमवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरी भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह ठाणे शहरात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. त्यात रात्री ३.३० ते ४.३० या कालावधीत सर्वाधिक ४५.९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, रविवार सकाळी ८.३० ते सोमवरी सकाळी ८.३० या २४ तासांत १२७.९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पावसाने उशिराने हजेरी लावली असली तरी, गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हावासीयांची पाण्याची तहान भागविणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत काही अंशी पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

लोकमान्य नगरमध्ये भूस्खलन

लोकमान्य पाडा नं. ४ येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी देखील येथील चार घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील चार घरे रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपती व्यवस्थापन विभागाने दिली. याठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे येथील दोन झाडे देखील धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील चारही घरे रिकामी करण्यात आली आहेत.

प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षांचा मुलगा जखमी

वागळे इस्टेट, पडवळ नगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अजिंक्यतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली. यात २ वर्षीय स्मित पवार याच्या पायाला दुखापत झाली. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तळ अधिक चार मजल्यांची ही इमारत असून ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. ही इमारत सी २ बी या गटात मोडत असून ती दुरुस्त करता येण्यासारखी आहे.

डोंबिवली : रविवारी रात्रभर धुवांधार कोसळलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण पावसामुळे ट्रक पाण्याखाली गेल्याने काही डोंबिवलीकरांचे सोमवारी आठवड्याच्या पहिल्या हाल डोंबिवलीकरांचे हाल झाले. रेल्वे वेळ रेल्वेसेवा ठप्प झाली होती. दिवशी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकांत आल्यावर प्रवाशांना नक्की माहिती मिळाली नाही. त्यामुळेच रेल्वे गाड्या विलंबाने जात असूनही लोकांनी गर्दीतही त्या पकडून प्रवास केला. मात्र गाड्या पुढे जाऊन एक मागोमाग थांबल्यानंतर खरी परिस्थिती प्रवाश्यांच्या लक्षात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग नसल्याने काहीही त्या गाडीतच थांबून तर काहींनी रेल्वेतून उतरून चालत आपल्या कामावर जाण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांची दमछाक झाली. रेल्वे धावत नाहीत हे समजून आल्यानंतर तसेच परत येणाऱ्या रेल्वे तुडुंब, खचाखच लोकांनी भरलेल्या दिसल्याने स्थानकात मुंबईला जाणाऱ्या लोकांनी अखेर पुन्हा घरीच जाणे पसंत केले. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६.१३ वाजता मुंबईला जाणारी बदलापूर लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ९.४५ वाजता आली. तेव्हापासून स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. रेल्वे प्रवास नको म्हणून काही जण रोडमार्गे जाण्यावर ठाम होते पण तो हो मनसुबा पूर्ण झाला नाही. नवीन मानकोली उड्डाणपूल मार्ग व कल्याण शीळ या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीमुळे गाड्या अडकून पडल्याने ठाणे व मुंबईत जाणाऱ्या लोकांची मोठी पंचायत झाली. त्यामुळे पुन्हा रेल्वे समांतर रस्त्याचे काय झाले, अशी विचारणा डोंबिवलीकर करीत होते. पहिल्याच पावसात ही दशा झाल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

ठाणे : ठाण्यात सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्खळीत झाली, तर रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडवला. ठाणे रेल्वे स्थानकात आणि रेल्वे मार्गावर पाणी तुंबल्याने लोकल तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही काळ रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा सुरू झाली; मात्र रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. परिणामी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची झुंबड उडाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना लेट मार्कला सामोरे जावे लागले. वाढती गर्दी आणि पावसाचा वाढता जोर पाहता अनेकांनी घरचा रस्ता गाठला.

रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीही कायम होता या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. सकाळी साडे सहा वाजल्यापासूनच पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर स्थानकात पाणी साचले होते, त्यामुळे कर्जत, कसाराहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल गाड्या ठाणे स्थानकाच्या पुढे जात नव्हत्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वे मार्ग पान्याहाळी गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे

दरम्यान जलद रेल्वे सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तर धीम्या मार्गावरील रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही काळानंतर पावसाने उसंती घेतली. साडे दहा वाजल्यानंतर पावसाने उसंती घेतली. त्यामुळे ठाणे, भांडुप आणि नाहूर स्थानकातील पाणी ओसरले. त्यांनतर सीएसएमटी ठाणे दरम्यान डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील रेल्वे सेवा मर्यादित वेगाने पूर्ववत करण्यात आली. मेल एक्स्प्रेस गाड्याही धिम्या गतीने हलवल्या जात होत्या. परंतु या लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत होत्या. याचा फटका नोकरदार वर्गाला बसला.

वन विभागाची संरक्षक भिंत कोसळली

तीनहात नाका परिसरात असलेल्या वनविभागाची संरक्षक भिंत जमीन खचल्याने कोसळली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही संरक्षक भिंत अंदाजे ८० ते ९० फुट लांब आणि ६० ते ७० फूट उंच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी देखील येथील दोन मोठी झाडे पडली आहेत. तीनहात नाका परिसरात वनविभागाचे जुने कार्यालय आहे. या ठिकाणी एका विकासकाचे काम सुरू असून त्या लागून ही वनविभागाची ७० फूट उंच असलेली संरक्षक भिंत आहे. संरक्षक भिंत कोसळल्याने येथील जमीनही खचली आहे. त्यामुळे येथील वनविभागाच्या वसाहतीला देखील धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही वसाहत लवकरात लवकर रिकामी करण्याबातव्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाणे शहरातही पावसाची दमदार हजेरी

रविवारी रात्रीपासून पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने ठाण्याच्या काही सखल भागात पाणी साचले होते. . परंतु महापालिकेने ठिकठिकाणी लावलेल्या पंपमुळे पाणी र साचून राहिले नसल्याचे दिसून आले. डोंगराची माती खचणे, वनविभागाची भिंत पडणे, रूमचे प्लास्टर पडणे आदींसह शहरात विविध ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी देखील वित्तहानी झाल्याचे दिसून आले, तर रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२७.९८ मिमी पावसाची नोंद झाली, तर सोमवारी सायंकाळपर्यंत १४.९६ मिमी पावसाची नोंद झाली.

logo
marathi.freepressjournal.in