

ठाणे : ठाणे पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे जलशुद्धीकरण केंद्राकडून येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून शहराला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने झोनिंग पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन केले असले तरी, मागील तीन दिवसात टँकरच्या तब्बल २०१ फेऱ्या झाल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
२७ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त ५८५ दशलक्ष लिटर पाणाच उपलब्ध होतो. लोकसंख्या वाढ आणि नवीन वसाहतींमुळे शहरावर पाणीअभावाची समस्या कायम असून, वाढीव पाणी मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीकडून पाणी घेणाऱ्या दिवा भागातही पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. शनिवारी सकाळी कल्याण फाटा परिसरातील महानगर गॅसच्या कामादरम्यान एक हजार मिमी व्यासाच्या या जलवाहिनीला मोठी हानी पोहोचली. त्यामुळे पिसे बंधाऱ्यातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्याने ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. पाईप लाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरु असून काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासूनच जाला वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.
ठाणे पालिकेकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढली असून ऐरवी आठ ते दहा फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील तीन दिवस - रविवार, सोमवार आणि मंगळवार या दरम्यान टँकरच्या २०१ फेऱ्या झाल्या असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. नवीन भाग जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून बुधवारी सायंकाळपर्यंत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असा विश्वास पालिकेचे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी व्यक्त केला आहे.
गृहसंकुलांमध्ये पाणी समस्या
ठाणे पालिकेच्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा ठाणे शहर, घोडबंदर, वर्तकनगर, वागळे इस्टेट, सिद्धेश्वर तलाव, कळवा आणि मुंब्रा भागात करण्यात येतो. परंतु महापालिकेच्या योजनेतील पाणी पुरवठ्यात कपात झाल्याने याठिकाणी आता विभागवार पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या भागांना दोन ऐवजी एकवेळ पाणी दिले जात आहे. तेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक गृहसंकुलांमध्ये टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
कधी किती टँकर?
रविवार ४३
सोमवार ७४
मंगळवार ८४
ठाणे पालिकेकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.