ठाणेकरांवर पाणी संकट! गृहसंकुलांना टँकर लॉबीचा फटका; आमदार केळकरांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे शहर आणि महानगरक्षेत्रात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पांची संख्या आणि अपुरी जलपुरवठा व्यवस्था यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक भागांमध्ये वर्षभर नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदरच्या काही गृहसंकुलांना वार्षिक टँकरच्या पाणी बिलापोटी ८५ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

ठाण्यातील वाढत्या नागरीकरणामुळे उपलब्ध जलस्रोतांवर ताण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अनेक गृहसंकुलांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी रहिवाशांना दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चेन्नई पॅटर्न राबवा, पोशीर, गारगाईसाठी जलनियोजन करावे

मुंबई महानगर प्रदेशातून ठाण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे, समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा चेन्नई पॅटर्न राबविणे, पोशीर आणि गारगाई प्रकल्पांतून भविष्यात ठाण्यासाठी स्वतंत्र जलवाटपाचे नियोजन करणे, तसेच एसटीपी प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढवणे या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

घोडबंदरकर टँकर लॉबीने हैराण

घोडबंदर भागातील गृहसंकुलांना नियमितपणे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. येथील लोढा अमारा गृहसंकुल, प्लॅटिनम हेरिटेज टँकरपोटी प्रत्येकी ८५ लाख रुपये खर्च करत आहेत. हावरे सिटीमधील इमारती २० लाख करत आहेत. हिरानंदानी इस्टेट, कॉसमॉस क्लासिक धर्मवीरनगर या भागासह उर्वरित ठाण्यातही हीच परिस्थिती आहे. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र आजही समस्या गंभीर असून तीन-तीन दिवस टँकर मिळत नाही, असे केळकर यांनी म्हटले आहे.

नवीन जलस्रोत शोधावेत

जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, आगामी २५ ते ३० वर्षांचा जलआराखडा तयार करणे आणि वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन पाणी स्रोतांचा शोध घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रश्नावर युद्धपातळीवर काम करण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी, जलतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची बैठक तातडीने बोलवावी, अशी त्यांनी लेखी पत्राद्वारे शिंदे यांच्याकडे केली आहे.

घोडबंदरवासीयांना विहिरींचे पाणी

ठाणे शहराच्या घोडबंदर परिसरातील वाढते नागरीकरण तसेच उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून आनंद नगर, ठा. म. पा उद्यान, कासारवडवली व कृष्णा ग्रीनलँड पार्क, कासारवडवली या परिसरातील तीन जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून त्यावर आरओ प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून आज त्याचा पाहणी दौरा करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसवणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरींतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in