पाणीटंचाईची दाहकता यंदा वाढणार; गत वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावपाड्याची संख्या अधिक

गेल्या दशकात २०१२-१३ या वर्षात ३८ गावं आणि ९८ पाडे अशा एकूण १३६ गावपाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत होता, त्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
पाणीटंचाईची दाहकता यंदा वाढणार; गत वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावपाड्याची संख्या अधिक

गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी चांगले होते, विशेष म्हणजे जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपले. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, असे असताना जलसंधारणाची कामे हव्या त्या प्रमाणात झाली नाहीत. याचा मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचमुळे गत वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी ९७ गावं आणि २७३ पाड्यांना टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागला होता, तर यंदा ९७ गावं आणि २८९ पांड्याना पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या टंचाई कृती आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत ४० गावं आणि १३७ पांड्याना ३० टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या दशकात २०१२-१३ या वर्षात ३८ गावं आणि ९८ पाडे अशा एकूण १३६ गावपाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत होता, त्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. २०१४ साली दोन जिल्हे एकत्र असताना २०८ गावे आणि ४५८ गावपाड्यांसाठी पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मोखाडा, वाडा, जव्हार, तलासरी,ड हाणू, पालघर हे बहुतांशी दुर्गम तालुके पालघर जिल्ह्यात गेल्यामुळे उर्वरीत ठाणे जिल्ह्यात शहरी भागांचे प्रमाण मोठे असल्याने पाणीटंचाईची झळ कमी बसेल अशी अपेक्षा होती. परंतू भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील २०१५ साली १७८ गावे आणि ३९५ पाड्यांचा समावेश टंचाई कृती आराखड्यात करण्यात आला होता. गेल्या काही वर्षात पाणीटंचाईयुक्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली होती. २०१६-१७ साली ३२६ पाडे आणि ९५ गावं, २०१७ -१८ साली ४१ गावे आणि १२० पांड्याना पाणीटंचाईची झळ बसली होती. २०२०-२१ साली ८७ गावं आणि २१४ पांड्याना टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागला.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घसरते राहिले आहे. १ जून ते १५ जुलै २०१५ पर्यंत एकूण ४०६४.३४ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१७ साली जिल्ह्यात चांगला पाऊस पडला होता. एकूण ३ हजार १८० मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र २० सप्टेंबर २०१८ पर्यंत दरवर्षीच्या सरासरी इतकाच पाऊस पडला. २०२०-२१ साली एकूण १०२ टक्के पाऊस पडला होता. २०२१-२२ साली जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. तर गेल्या वर्षी जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान सरासरी अंदाजे १७ हजार १५० मिमी पाऊस पडत असतो. जून महिन्यात अंदाजे ३ हजार १८८ मिमी पावसाची नोंद होत असते. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टपर्यंत ठाणे जिल्ह्यात २१ हजार ६४ मिमी पाऊस पडला होता असे, असतानाही पाणी अडवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदाचा उन्हाळा शहापूर तालुक्याची परीक्षा घेणारा

दर वर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील पहिला टँकर शहापूर तालुक्यात सुरू झाला. जसाजसा उन्हाळा वाढत गेला तसा पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. यंदाही पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका याच तालुक्याला बसला आहे. सध्या जिल्ह्यात ३० गावं आणि १३७ पांड्याना टँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यातील सर्वाधिक टँकर शहापूर तालुक्यात पाठविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in